Jamkhed News : ऐन उन्हाळ्यातील तीव्र उकाड्यात वीजटंचाईने त्रस्त झालेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील नागरिकांनी आज आक्रमक भूमिका घेतली. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. (Jamkhed News) मतदारसंघात ४० ते ४२ अंशांपर्यंत तापमान असताना अनियमित व खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना उकाड्याचा तीव्र त्रास सहन करावा लागत असून, ग्रामीण भागात सिंगल फेज वीजही उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेला थ्री-फेज वीजपुरवठा खंडित होत असल्याने उन्हाळी पिकांवर परिणाम होत आहे. (Jamkhed News) याशिवाय जळालेले डीपी वेळेत न बदलणे, कोटेशन भरूनही नवीन जोडण्या न मिळणे, कमी दाबाचा वीजपुरवठा, तसेच ‘मागेल त्याला सोलर’ योजनेत विलंब अशा अनेक समस्या नागरिकांनी मांडल्या. (Jamkhed News) चिलवडी आणि माही जळगाव उपकेंद्रांची प्रलंबित कामेही अद्याप पूर्ण झालेली नाहीत. विशेषतः एजी फीडरवरील सायंकाळी ६ ते ९ या वेळेतील वीज कपातीमुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडत असल्याचे सांगण्यात आले. (Jamkhed News) या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलनानंतर महावितरण अधिकाऱ्यांनी परिस्थितीची दखल घेत लवकरच वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. (Jamkhed News) सायंकाळी ६ ते ९ दरम्यान खंडित होणारा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, तसेच तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून, आता प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (Jamkhed News)