Jamkhed News : जामखेडमध्ये खळबळ! हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये नर्सची आत्महत्या; हातावर इंजेक्शनच्या खुणा
Jamkhed News : जामखेड शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये शबनम सय्यद या २९ वर्षीय नर्सने आत्महत्या केली.

Jamkhed News : शहरातील बसस्थानक परिसरातील एका खासगी रुग्णालयात नर्सने बाथरूममध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शबनम दस्तगीर सय्यद (वय २९) असे मृत महिलेचे नाव असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Jamkhed News)
मिळालेल्या माहितीनुसार, शबनम या गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. सुमारे साडेदहा वाजता त्या रुग्णालयातील बाथरूममध्ये गेल्या, मात्र बराच वेळ बाहेर न आल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. दरवाजा तोडून पाहिले असता त्या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनास्थळी इंजेक्शनची सुई आढळून आल्याने आत्महत्येची पद्धत आणि कारणाबाबत संशय निर्माण झाला आहे. शबनम यांच्या हातावर इंजेक्शन टोचल्याचे खुणा दिसून आल्या आहेत. नेमके कोणते औषध घेतले होते, यासाठी डॉक्टरांनी व्हिसेरा जतन करून ठेवला असून तो तपासणीसाठी नाशिक येथे पाठवण्यात येणार आहे. (Jamkhed News)
याप्रकरणी शबनम यांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. शबनम या विवाहित असून त्यांना दोन लहान मुले आहेत. वैयक्तिक कारणांमुळे त्या काही वर्षांपासून माहेरी जामखेड येथे राहत होत्या आणि स्थानिक रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होत्या. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Jamkhed News)





