Abhijit Patil : ‘रोहित पवार मोठे नेते, त्यांच्या चुका सांगण्याइतका मी मोठा नाही’; अभिजीत पाटलांचं विधान, म्हणाले “पवार कुटुंब…”
Abhijit Patil : 'रोहित पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्या चुका सांगण्याइतपत मी मोठा नाही,' असं म्हणत पवार कुटुंबाने एकत्र यावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

Abhijit Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडी आणि दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच शरद पवार गटाचे माढा तालुक्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबाबाबत मोठं विधान केलं आहे.
‘रोहित पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्या चुका सांगण्याइतपत मी मोठा नाही,’ असं म्हणत पवार कुटुंबाने एकत्र यावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर थेट भाष्य करणं अभिजीत पाटील यांनी टाळलं. मात्र, पवार कुटुंब एकत्र येणं राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही पक्षांनी घड्याळ या चिन्हावर एकत्र निवडणूक लढवली होती आणि जागाही निवडून आणल्या होत्या, असंही ते म्हणाले.
निवडणुका झाल्यानंतर आपण पुन्हा एकत्र येणार असल्याचं स्वतः अजित पवार यांनी आपल्याला सांगितलं होतं. त्यामुळेच दोन्ही पक्षांनी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा अभिजीत पाटील यांनी केला.
पवार कुटुंबाने एकत्र यावं, राज्याला वेगळी दिशा द्यावी आणि शरद पवार यांच्या सहा दशकांच्या राजकीय अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, अशी भूमिका अभिजीत पाटील यांनी मांडली.
उमेश पाटील यांनी केलेल्या दाव्यावर अभिजीत पाटील म्हणाले…
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा केला होता. या दाव्यावर प्रतिक्रिया देताना अभिजीत पाटील म्हणाले की, रोहित पवार सध्या आमच्या संपर्कात नसल्यामुळे ते नेमका काय निर्णय घेणार आहेत, याची आपल्याला माहिती नाही. त्याबाबत त्यांनाच विचारणं योग्य ठरेल.





