Rohit Pawar: एमपीएससीत भ्रष्ट अधिकाऱ्यांची वर्णी लावू नका; रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांना थेट टोला
Rohit Pawar: एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर भरतीतील गैरप्रकार आणि पेपरफुटीप्रकरणी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान परीक्षार्थ्यांचा मोर्चा.

Rohit Pawar – सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या मित्रांचे पुनर्वसन आपल्या पक्षात करावे. आयोगासारख्या घटनात्मक संस्थेत भ्रष्ट अधिकाऱ्यांची वर्णी लावू नका, टोला असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे आमदार रोहित पवार लगावला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ड्रग इन्स्पेक्टर पदाच्या भरतीत झालेल्या गैरप्रकारानंतर सोमवारी पुण्यातील स्पर्धा परीक्षांच्या परीक्षार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला होता.
यामध्ये रोहित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार विश्वजित कदम, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक विठ्ठल कांगणे, स्पर्धा परीक्षा शिक्षकांचे प्रतिनिधी सचिन ढवळे, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. परीक्षार्थींनी केलेल्या विविध मागण्यांमध्ये आयोगाचे अध्यक्ष अध्यक्ष विवेक भीमनवार, सचिव महेंद्र हरपाळकर यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्या जागी स्वच्छ प्रतिमेचे पदाधिकारी नेमावेत, ही मुख्य मागणी आहे.
त्याशिवाय परीक्षेतील आक्षेपांवर ८ दिवसांत स्पष्टीकरण देऊन गैरप्रकाराची चौकशी करावी, राज्यसेवा मुख्य २०२५ आणि कृषिसेवा परीक्षेच्या वर्णनात्मक पेपर तपासणीतील चुकांची चौकशी व्हावी, पेपरफुटी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रँचचा प्राथमिक चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अटकेत असलेले आरोपी अपर सचिव अभिजीत लेंवडेच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे, आरोपी लेंडवे,
मराठे आणि नखाते यांच्या सेवाकाळाची व पदोन्नती निकषांची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासावे, एजंट्सच्या सहभागाची सखोल चौकशी व्हावी, इतर परीक्षांच्या निकालांबाबत विद्यार्थ्यांच्या शंकांची दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करावी, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या. परीक्षार्थींना पक्षाचा पाठिंबा जाहीर करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी सकाळीच मोर्चात सहभाग नोंदवला.
महाराष्ट्रातील मुलांना आंदोलन करायला लागणे दुर्दैवी असून, सरकारने जबाबदारी व्यक्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी चर्चा करावी, हा त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, असे सुळे या वेळी म्हणाल्या. गुन्हे दाखल करायचे असतील तर आमच्यावर करा; पण विद्यार्थ्यांच्या अंगाला हात लावला, तर खबरदार. सरकारने येत्या तीन दिवसांत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास शास्त्री रस्त्यावर चक्काजाम करून याहून तीव्र लढा उभारू, असा थेट इशारा रोहित पवार यांनी दिला.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणणे पुरोगामी महाराष्ट्र खपवून घेणार नाही. एमपीएससीची स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवावी, प्रत्येक जिल्ह्यात आयोगाचे कार्यालय सुरू करावे आणि सर्व परीक्षा ऑफलाइनच घ्याव्यात. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत राजकीय नेत्यांऐवजी केवळ विद्यार्थी व शिक्षकांच्या शिष्टमंडळानेच चर्चा करावी, अशी मागणीही पवार यांनी केली.






