Raksha Khadase | Rohini Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात एकूण पाच जणांवर पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली असून अनिकेत भोई या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपी हे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे म्हंटल होत. अश्यातच, आता पुन्हा एकदा शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. काल (दि. १४) जळगावात धुलीवंदन सण साजरा करत असताना त्या म्हणाल्या की, “राज्य सरकारने राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावं. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. अलीकडेच एक सर्वेक्षण झालं, ज्या सर्वेक्षणाच्या अहवालात असं म्हटलं आहे की आशिया खंडातील महिलांसाठीच्या सर्वात असुरक्षित देशांपैकी भारत एक आहे. या यादीत भारताची गणना होणं हे भारतासाठी खूपच दुर्दैवी आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती नाही. त्यामुळेच गुन्हेगारी घटना घडत आहेत. असं त्या यावेळी म्हणाल्या. १० दिवसांनंतरही गुन्हेगार फरार : दरम्यान, यावेळी रोहिणी खडसे यांना त्यांच्या भाचीच्या छेडछाड प्रकरणाच्या तपासाविषयी प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “त्या घटनेला १० दिवस उलटले आहेत. तरीदेखील या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींना नेमकं कोणाचं पाठबळ आहे असा प्रश्न पडला आहे. त्यांच्यामागे नेमका कोण आका आहे ते शोधायला हवं. कोणाचं तरी त्यांना पाठबळ मिळतंय म्हणूनच ते इतके दिवस फरार राहू शकले.” रोहिणी खडसे म्हणाल्या, “एका केंद्रीय मंत्र्याच्या घरातील मुली सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रातील सामान्य माताभगिनींच्या सुरक्षिततेबद्दल काय बोलणार. इतकी मोठी घटना होऊनही आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे माझी मागणी आहे की सरकारने कायद्याचा वचक निर्माण करावा. माझी, तुमची किंवा कोणाचीही मुलगी असली तरी तिला संरक्षण मिळायलाच हवं आणि ती सरकारची जबाबदारी आहे.” नेमकं काय घडलं होत? जळगावामधील मुक्ताताईनगरमध्ये यात्रेसाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि त्यांची मुलगी आल्या होत्या. या यात्रेमध्ये काही टवाळखोर मुलांकडून खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली. या घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार समजताच मंत्री रक्षा खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेत महिलांसह थेट अहिल्यानगर पोलीस ठाणे गाठले. रक्षा खडसेंनी फोनवरुन एका कार्यकर्त्याला झापलं : पियुष, तुमच्या जुन्या गावामध्ये त्या पोरांनी कृषिकाचा व्हिडिओ काढला अन् तुम्ही त्याला सपोर्ट करता. दोनवेळा तसं झालं ना, हे बघ मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय, अशा शब्दात व्हिडिओ काढणाऱ्या टवाळखोरांच्या मित्राशी खासदार रक्षा खडसे यांनी फोनवरुन संवाद साधत इशारा दिला. रक्षा खडसे आणि या घटनेतील टवाळखोरांचा मित्र असलेल्या पियुष यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये रक्षा खडसेंनी आई म्हणून मुलीची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांबद्दल तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. ती माझी मुलगी होती, तिच्या सुरक्षेसाठीच मी त्या लोकांना तिथं ठेवलंय. तुम्ही फक्त त्या आमदाराचे पाय चाटायला तिथ बसलेले आहेत. ते आमदाराचेच लोकं होते ना, असेही रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.