Rohini Khadse On Pranjal khewalkar : 24 तासानंतर रोहिणी खडसेंनी मौन सोडलं, म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर…

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात रविवारी (27 जुलै) पहाटे घडलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने स्टे बर्ड हॉटेलवर छापा टाकून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह 5 पुरुष आणि 2 तरुणींना अटक केली आहे.
या छाप्यात कोकेनसदृश्य पदार्थ, 70 ग्रॅम गांजा, हुक्का पॉट, दारू, बिअरच्या बाटल्या, 10 मोबाईल आणि 2 चारचाकी गाड्यांसह 41.35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाने राजकीय वादळ निर्माण केले असून, रोहिणी खडसे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया
या प्रकरणानंतर 30 तासांनी रोहिणी खडसे यांनी फेसबूकवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी पती प्रांजल खेवलकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे कि की, “कायदा आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर आहे आणि योग्य वेळी सत्य बाहेर येईल.” अशी रोहिणी खडसे यांनी दिली आहे. त्यांनी या प्रकरणी थेट आरोपांवर भाष्य टाळले आहे. तसेच, पोलिसांनी रोहिणी खडसे यांच्या हडपसर येथील बंगल्यावरही छापा टाकला असून, तिथून लॅपटॉप आणि हार्ड डिस्क जप्त केली आहे.
एकनाथ खडसेंचा राजकीय षडयंत्राचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनी या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. ते म्हणाले, जर माझ्या जावयाने रेव्ह पार्टी आयोजित केली असेल किंवा त्याचा गुन्ह्यात सहभाग असेल, तर मी त्याचे समर्थन करणार नाही. पण ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहे का, याची चौकशी व्हायला हवी. खडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरुद्ध टीका केली होती, आणि त्यानंतर लगेचच ही कारवाई झाल्याने त्यांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला आहे.
‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?
पुणे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने पहाटे 3:30 च्या सुमारास खराडीतील स्टे बर्ड हॉटेलवर छापा टाकला. हॉटेलच्या दोन खोल्या (101 आणि 102) प्रांजल खेवलकर यांच्या नावाने 25 ते 28 जुलै आणि 26 ते 27 जुलै या कालावधीसाठी बुक केल्या होत्या. या खोल्यांमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याचे पोलिसांना आढळले.
या छाप्यात पोलिसांनी 2.7 ग्रॅम कोकेनसदृश्य पदार्थ, 70 ग्रॅम गांजासह दारू, बिअर आणि हुक्का जप्त केला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रांजल खेवलकर (वय 39), निखिल पोपटानी, समीर सय्यद, श्रीपाद यादव, सचिन भोमबे, इशा सिंग (वय 22) आणि प्राची शर्मा (वय 23) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना 29 जुलैपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर रोहित पवार आणि रोहिणी खडसे हे दोघे पुणे पोलीस आयुक्तांची आज (28 जुलै) 11 वाजता भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.





