Eknath Khadse : नाथाभाऊ, तुमच्या गुलाबी गप्पा कुणासोबत? अखेर गिरीश महाजनांनी अस्त्र काढलं बाहेर

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. खानदेशातील या दोन दिग्गज नेत्यांमधील ‘कलगीतुरा’ आता नव्या वादाने पेटला आहे. गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर ‘गुलाबी गप्पा’ आणि प्रफुल्ल लोढा यांच्यासोबतच्या कथित ‘षड्यंत्रा’वरून जोरदार हल्ला चढवला आहे. या प्रकरणाने जळगावच्या राजकारणात खळबळ माजवली आहे.
गुलाबी गप्पा’ आणि प्रफुल्ल लोढा प्रकरण
गिरीश महाजन यांनी 24 जुलै रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पोस्टमध्ये खडसे यांच्यासोबत प्रफुल्ल लोढा यांचा गुलाब हातात घेतलेला फोटो आणि खडसे यांचा कारमधील फोटो शेअर करत महाजन यांनी खोचक टीका केली. त्यांनी लिहिले, “एकनाथ खडसे... तुमच्या या ‘गुलाबी गप्पा’ कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय…”
एकनाथ खडसे… तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय…
हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात ?
हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे…२०१९ ते… pic.twitter.com/kEVXjsOYcq
— Girish Mahajan (@girishdmahajan) July 24, 2025
महाजन यांनी खडसे यांनी यापूर्वी प्रफुल्ल लोढा याला ‘दारूडा’ म्हटले होते, आणि त्याच लोढाने खडसे यांच्यावर त्यांच्या मुलाच्या (निखिल खडसे) खुनाचा आरोप केल्याचा उल्लेख केला. या फोटोमुळे खडसे-लोढा यांच्यातील कथित जवळीकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खडसे यांनी यापूर्वी महाजन यांच्यावर हनी ट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढाशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यांनी लोढाकडे महत्त्वाचे पुरावे असल्याचा दावा करत या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली होती. याला प्रत्युत्तर देताना महाजन यांनी खडसे यांच्यावरच लोढाशी संगनमताने स्वतःला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
खडसे-महाजन यांच्यातील जुना वाद काय?
खडसे आणि महाजन यांच्यातील वैर जुने आहे. दोघेही जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नेते असून, एकेकाळी भाजपमध्ये एकत्र होते. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांना तिकीट नाकारण्यात महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. यानंतर खडसे यांनी 2020 मध्ये भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला. तेव्हापासून दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक चकमकी आणि आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत.





