Road Safety: सासवड-सुपा रस्त्यावर मृत्यूचा सापळा! ३६४ कोटींच्या कामात सुरक्षेचा पुरता बोजवारा
Road Safety: सुरक्षा बॅरिकेड्स आणि इशारा फलकांचा पूर्णपणे अभाव; केवळ रेडियम स्टिकर लावून ठेकेदाराकडून सुरक्षेची औपचारिक पूर्तता.

Road Safety – सासवड-सुपा-उंडवडी-भिगवण मार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामात सुरक्षेच्या नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर आले आहे. 364 कोटी रुपयांचे काम सुरू असल्याचा गवगवा केला जात असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून होत आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा महामार्ग अपघाताचा सापळा बनला असून, एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. पारगाव, खानवडी, ऐखतपूर, मंजुवडी आणि कुंभारवळण परिसरात रस्त्याच्या एका बाजूचे काँक्रीटीकरण पूर्ण करून त्याच मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला सुरू असलेल्या कामामुळे दोन्ही बाजूंमध्ये अडीच ते तीन फूट उंचीचा फरक निर्माण झाला आहे. समोरासमोर दोन वाहने आल्यास एखादे वाहन रस्त्याखाली घसरून पलटी होण्याची शक्यता प्रबळ असून,
भीषण अपघाताची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा बॅरिकेड्स, मोठे इशारा फलक, धोक्याच्या सूचना, रात्रीसाठी प्रकाश व्यवस्था किंवा सुरक्षित वाहतूक व्यवस्थापनाचा पूर्णपणे अभाव आहे. केवळ काही ठिकाणी लहान रेडियम स्टिकर लावून सुरक्षेची औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे.
रात्रीच्या वेळी हा मार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याची भावना वाहनचालक व्यक्त करत आहेत. हे काम राजपत इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीमार्फत सुरू असून, कंपनीच्या निष्काळजी कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. कामाच्या गुणवत्तेबाबतही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, संबंधित यंत्रणा मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे.
दावा कितपत खरा…
कामावरील सुपरवायझर शिवा रेड्डी यांनी, “कामाच्या ठिकाणी सर्व आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत,” असा दावा केला. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती हा दावा साफ खोटा ठरवत आहे. घटनास्थळी सुरक्षेची अत्यावश्यक साधनेच नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. एकीकडे नागरिकांच्या करातून कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता उभारला जात आहे,
तर दुसरीकडे त्याच नागरिकांच्या जीवाची किंमत शून्य मानली जात असल्याचे चित्र आहे. एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करून ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करावी, अन्यथा संभाव्य अपघाताची संपूर्ण जबाबदारी संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारावर राहील, अशी संतप्त मागणी नागरिकांनी केली आहे.






