पुणे जिल्हा | रस्ता की डम्पिंग ग्राऊंड…?

आळंदी, {एम. डी. पाखरे/ज्ञानेश्वर फड} – तीर्थक्षेत्र आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधीस्थळ, पुण्याच्या जवळ आणि एमआयडीसी परिसर यामुळे आळंदी आणि लगतची चर्होली खुर्द, केळगाव या गावांमध्ये झपाट्याने लोकवस्ती वाढत आहे.
मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना मुलभूत गरजा पुरविण्यात प्रशासन तोडके पडले असून येथील कचरा जिरवायला जागा नसल्याने आळंदी नगरपरिषद,
केळगाव ग्रामपंचायत आणि चर्होली खुर्द ग्रामपंचायतीच्या वेशीवरील रस्ते आहेत की डम्पिंग ग्राऊंड असे म्हणण्यची सध्या वेळ आली असून हा कचरा उचलण्यासाठी हाद्दीचा वाद पुढे केला जात असल्याने येथून नाक मुठीत घेऊनच जा-ये करायचे एवढे मात्र नक्की!
नागरिकांचे आरोग्य धोक्यात –
रस्त्यावर टाकला जाणारा कचरा अनेक दिवस उचलला जात नाही. ओला, सुका, वैद्यकीय असा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा एकाच ठिकाणी पडतो. रस्त्याने ये-जा करणार्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना नाकाला रुमाल लावून चालावे लागते.
तर जवळील सदनिकाधारकांना दिवसरात्र या कचर्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच पाऊस पडल्यास त्या कचर्यातील जंतू इतरत्र पसरून नागरिकांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.
हद्दीच्या वादात नागरिकांची होरपळ
आळंदी, चर्होली, केळगाव ही तीन्ही गावे हद्दीने वेगळी असली तरी नागरिकांचा वावर एकत्रच आहे. अशावेळी कोण कुठे कचरा टाकतो हे स्पष्ट होत नाही. सध्या दिसणारे ढिग हे केळगाव आणि चर्होली ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात दिसतात.
मात्र त्यातील कचरा बाहेरील लोकांनी आणून टाकला असल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर तो आमच्या हद्दीतील कचरा नाही तर आम्ही का उचलावा असे काहींचे म्हणणे आहे. मात्र प्रशासकीय हद्दीच्या वादात सामान्य नागरिक होरपळा जात आहे.
कचर्याचे मूळ कारण
लोकसंख्या वाढल्यामुळे पारंपरिक कचरा व्यवस्थापन संसाधने कमी पडत आहेत. अनेक भागात नियमित कचरा उचलण्यासाठी गाडी जात नाही.
काही भागात गेली तरी मुख्य रस्त्यावरून फिरते, गल्ली बोळात जात नाही, त्या लोकांना गाडी येऊन गेल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे साठलेल्या कचर्याचे करायचे काय? असा प्रश्न नागरिकांना पडतो. परिणामी तो कचरा या रस्त्यांवर रात्री-अपरात्री टाकताना लोक दिसून येतात.
प्रशासनाकडून कारवाईचा इशारा
प्रशासकीय अधिकार्यांकडून रस्त्यावर कचरा टाकणार्या लोकांवर कारवाईचा इशारा देण्यात येतो. मात्र प्रशासनाने आमचा कचरा घंटागाडीतून उचलून नेल्यास आम्ही तो कचरा रस्त्यावर का टाकू असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.
त्या कचर्याचा आम्हा नागरिकांनाच त्रास होतो. मात्र कचरा नेला जात नाही त्यामुळे पर्याय उरत नसल्याचे नागरिक सांगतात.
लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी
आळंदी हे राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी आहे. राज्यभरातून लाखों भाविक श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी दर्शनासाठी येत असतात.
मात्र आळंदीत प्रवेश करताना कचर्याच्या दुर्घंधीने त्यांचे स्वागत होत असल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरत आहे. हद्दीच्या अंतर्गत प्रशासकीय वादामुळे कचरा उचलला जात नाही आणि नागरिकांनाही त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हा प्रश्न गंभीर बनत चालला असून तालुका, जिल्हा पातळीवरील प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आळंदी, केळगाव, चर्होली खुर्द तीनही भागातील प्रशासनात समन्वय साधून प्रश्न सोडवावा, अशी मागणी तिन्ही हद्दीतील लोक करत आहेत.





