Alandi News : आळंदीत बाल हक्क संवेदनशीलता आणि जनजागृती; बाल हक्क संरक्षण आयोगाचा पुढाकार
Alandi News : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने आळंदीत बाल हक्क संवेदनशीलता कार्यक्रम संपन्न; पथनाट्यातून दिला प्रभावी संदेश.

Alandi News – महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांच्या वतीने आळंदी येथे बाल हक्क संवेदनशीलता आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी (दि. २४) फ्रुटवाले धर्मशाळा सभागृहात सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये बालकांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि समाजाची संवेदनशीलता वाढवणे हा होता.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अवर सचिव श्रीमती वंदना जैन, नगराध्यक्ष प्रशांत पोपट कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पोलीस निरीक्षक भिमा नरके, माजी सदस्य संतोष शिंदे, मनमुक्ता फाउंडेशनच्या डॉ. आश्विनी गेतें आणि प्रशासन अधिकारी सोनाली झिंजुर्डे यांच्यासह आळंदी नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी प्रास्ताविक करताना बाल हक्क संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात पुनम गायकवाड आणि मुस्कान फाउंडेशनच्या टीमने प्रभावी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. वंदना जैन यांनी आयोगाच्या कामकाजाची माहिती दिली, तर संतोष शिंदे यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना बाल हक्कांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
विशेषतः पुनम गायकवाड यांनी ‘गुड टच-बॅड टच’ या संवेदनशील विषयावर बालकांना मार्गदर्शन केले आणि डॉ. आश्विनी गेतें यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मुलांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश बहिरट आणि दत्तात्रय ढेंगळे यांनी केले. या यशस्वी आयोजनासाठी वैशाली पाटील, अर्जुन घोडे, शशांक कदम, महेश घुंडरे, शशिकांत चव्हाण, शुभम कुऱ्हाडे, उद्धव मते, योगिता कुऱ्हाडे आणि जयश्री वाळुंज यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता पूजा घुंडरे यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाली. या उपक्रमामुळे बालकांच्या सुरक्षिततेसाठी समाजात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





