Alandi News – श्रीक्षेत्र आळंदी व परिसरातील वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि बालकांवरील लैंगिक शोषण रोखण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या विशेष प्रशासकीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज आळंदी नगरपरिषद कार्यालयात पार पडली. विभागीय आयुक्त, पुणे यांच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या या समितीचे अध्यक्षपद खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी भूषविले. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा सविस्तर आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याची (पोक्सो) प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. संस्थांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, विद्यार्थ्यांसाठी तक्रार पेटी उपलब्ध करून देणे, नियमित समुपदेशन करणे आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक इतर तांत्रिक उपाययोजना राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशासनामार्फत लवकरच या संदर्भात एक मानक कार्यपद्धती तयार करण्यात येणार असून, सर्व संस्थांना त्याचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील, असे स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस समितीचे सचिव तथा मुख्याधिकारी माधव खांडेकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, आळंदीचे पोलीस निरीक्षक भिमा नरके, दिघीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सचिन महाजन, आरोग्य अधिकारी आर. बी. ढाकणे, मुख्याध्यापक संतोष मरभळ आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वारकरी शिक्षण संस्थांमधील बालकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे.