RMC Plant Pollution: पोंदेवाडीत आरएमसी-डांबर प्रकल्पाचा धूर! शेतजमीन, आरोग्य अन् प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
RMC Plant Pollution: अष्टविनायक महामार्गालगत वाळुंजखारावस्तीत नियमांचे उल्लंघन करून प्रकल्प सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप; प्रशासनाकडून चौकशीची मागणी.

RMC Plant Pollution – आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी गावच्या हद्दीत अष्टविनायक महामार्गालगत वाळुंजखारावस्ती येथे गेल्या चार-पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या आरएमसी व डांबर प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. संबंधित कंपनीने ग्रामपंचायतीची आवश्यक परवानगी न घेता प्रकल्प सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, प्रशासनाने तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल,
असा इशारा आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी दिला आहे. माजी उपसरपंच संदीप पोखरकर, महेंद्र पोखरकर आणि अमोल वाळुंज यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित आवारात दररोज सुमारे 180 ते 200 लोकांची ये-जा असते. त्यामुळे लगतच्या ग्रामस्थांसह शेतकर्यांना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
प्रकल्पामुळे परिसरातील नागरिक आणि जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, लगतची शेतजमीन नापीक होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. या आरोपांची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्यानंतर संबंधित कंपनीला तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मात्र, अद्याप आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, तसेच प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील आवश्यक प्रमाणपत्रे कंपनीकडे आहेत का, याची तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्याचबरोबर प्रकल्पाच्या आवारात काम करणार्या कामगारांची माहिती प्रशासनाकडे देण्यात आली आहे का, याचीही चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.





