Patas Accident: एका झाडाने कसे वाचवले संपूर्ण कुटुंब? दौंड-अष्टविनायक मार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर थेट नर्सरीत घुसला
Patas Accident: दौंड अष्टविनायक मार्गावर पाटस हद्दीतील गार फाट्याजवळ पहाटे भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर नर्सरीत घुसला.

Patas Accident – दौंड अष्टविनायक मार्गावर सोमवारी (दि.१७) रोजी पहाटे साडेसहाच्या सुमारास एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. पाटस हद्दीत भरधाव कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा कंटेनर थेट रस्त्यालगत असलेल्या लडकत यांच्या नर्सरीत घुसला. सुदैवाने अपघात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र, नर्सरीमालकांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दौंडच्या बाजूकडून पाटसकडे जाणारा भरधाव कंटेनर पाटस हद्दीतील गार फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटून रस्ता सोडून थेट लडकत यांच्या घरासमोरील झाडे-फुलांच्या नर्सरीत घुसला.
पहाटे अचानक मोठा आवाज आल्याने आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये घबराट पसरली. घराबाहेर येऊन पाहिले तर नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकली. अपघात इतका भीषण होता की, कंटेनरचा वेग प्रचंड होता. परंतु घरासमोरील करंजीचे झाड मध्ये आल्याने कंटेनरचा वेग काहीसा मंदावला. त्यामुळे कंटेनर थेट घरात न शिरता नर्सरीच्या आवारातच थांबला. हे झाड नसते तर कंटेनर थेट घरात घुसला असता.
मोठी जीवितहानी झाली असती, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. अपघात नर्सरीमधील लहान-मोठी रोपे, फुलझाडे, इतर साहित्याची मोठी मोडतोड झाली. काही क्षणांतच मेहनतीने उभारलेली नर्सरी मातीमोल झाल्याने लडकत कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते.
पोलीस गस्त वाढवा
मार्गावरील भरधाव वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही आणि पोलीस गस्त वाढवण्यात यावी, अशी स्थानिकांची अष्टविनायक मार्ग प्रशासनाला मागणी आहे. यापुढे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे.



