Santosh Chavan: पुण्यात डीजे चर्चेवरून राडा! बापटांवर हल्ला करणाऱ्या चव्हाणला १ दिवसाची पोलीस कोठडी
Santosh Chavan: आरोपीवर यापूर्वीच ६ गंभीर गुन्हे दाखल; मारहाणीमागील मुख्य उद्देश शोधण्यासाठी न्यायालयाने सुनावली एक दिवसाची पोलीस कोठडी.

Santosh Chavan – गणेशोत्सव आणि डीजेबाबत वृत्तवाहिनीला मुलाखत देत असलेल्या विद्यानंद बापट यांना मारहाण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अटक केलेल्या संतोष शंकर चव्हाण (वय ३२, रा. राऊतवाडी, कोथरूड) याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत विद्यानंद सुहास बापट (वय ३७, रा. नारायण पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि. ३) सकाळी टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळाजवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापट एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आरोपीने त्यांचा रस्ता अडवून तू आमच्या गणेशोत्सवात अडथळा निर्माण करतो का, असे म्हणत मारहाण करत अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बापट तेथून निघून जातानाही आरोपीने त्यांना अडवून गालावर मारल्याचा आरोप आहे.
त्याला न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी गुन्ह्याचा उद्देश काय आहे, अन्य कोणाचा सहभाग आहे का, फिर्यादी आणि आरोपीमध्ये पूर्वीचा वाद होता का, चव्हाणने समाज माध्यमांवर यापूर्वीही एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केला होता. त्याच्यावर यापूर्वी शरीराविरुद्धचे सहा गुन्हे दाखल आहेत.
या गुन्ह्यामागील उद्देश शोधण्यासाठी तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे आणि सरकारी वकील आर. डी. कोरडे यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. या वेळी बचाव पक्षाचे वकील ॲड. हेमंत भांड पाटील आणि ॲड. खेतराम सोलंकी यांनी बाजू मांडली.





