RMC Plant Dispute : पुणेकरांच्या घराचे स्वप्न महागणार? आरएमसी प्लांटच्या वादाचा थेट तुमच्या खिशाला फटका
RMC Plant Dispute : एमपीसीबी आणि महापालिकेच्या कारवाईनंतर आरएमसी प्लांट चालकांचा आक्रमक पवित्रा; उत्पादनावर मर्यादा आल्याने दरात मोठी वाढ.

RMC Plant Dispute – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महापालिकेने आरएमसी प्लांटवर कारवाईचा धडाका सुरू केला. यावर आरएमसी प्लांट चालक, व्यावसायिकांनी अघोषित बंद पुकारला. परिणामी, बांधकाम प्रकल्प ठप्प झाले. आताही, हा वाद धुमसतोच आहे. यातून तयार करण्यात आलेली नियमावली अशा प्लांटवर निर्बंध दर्शविणारी असली तरी दुसरी बाजू पाहता याचा परिणाम थेट घरांच्या किंमती स्क्वेअर फूट मागे वाढण्यावर होणार आहे.
ही वाढ प्रति चौरस फूट दरात ५०० ते ८०० रुपयांपर्यंत ही असू शकते, अशी शक्यता वर्तविली जात आहे. आरएमसी प्लांटजवळ राहणाऱ्या नागरिकांनी आक्षेप घेत असे प्लांट गावाबाहेर स्थलांतरीत करण्याची मागणी केली. याविषयी याचिकाही दाखल करण्यात आल्या. एमपीसीबीकडे याच्या तक्रारी करण्यात आल्या. यानुसार अशा प्लांटवर कारवाईचे आदेश एमपीसीबीने महापालिकेला दिले.
यावरून पालिकेने कारवाई केली परंतु, याला विरोध करीत प्लांट चालकांनी १५ एप्रिलपासून प्लांट बंद ठेवले. महापालिका, एमपीसीबी आणि पीएमआरडीए यांनी नियमावली करून द्यावी, अशी मागणी प्लांट चालकांच्या संघटनेने केली. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत सगळ्यांची बैठक घेत नियमावलीही तयारी केली.
परंतु, यातून असे प्लांट केवळ तीनच दिवस चालवायला परवानगी दिली गेली, त्यामुळे आता उत्पादनावर मर्यादा, वाढलेला वाहतूक खर्च, कमी वेळेत जादा उत्पादन घ्यायचे असेल तर वाढलेला मनुष्यबळाचा खर्च भरून काढण्यासाठी आरएमसी असोसिएशनने आरएमसी दरात शनिवार (दि.९) पासून दरवाढ केली आहे. त्यामुळे साहजिकच याची झळ बांधकाम व्यावसायिकांना बसणार असली तरी त्याची भरपाई सर्वसामान्यांच्या खिशातूनच जाणार हे उघड आहे.
यापूर्वी आठवड्याचे सातही दिवस पूर्णवेळ चालणारे आरएमसी प्लांट आता केवळ बुधवार, शनिवार आणि रविवार या तीनच दिवशी सकाळी सहा ते सायंकाळी पाच या वेळेत चालवायला परवानगी दिली आहे. इतर चार दिवसांत केवळ सहा तासांची मर्यादा असेल, तसेच नो एन्ट्रीच्या मार्गांवर ट्रान्झिट मिक्सरसाठी वेळेचे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
या वेळेअभावी कामाचे नियोजन कोलमडून खर्च वाढणार आहे. काँक्रीटच्या दरासोबतच आता पंपींग आणि विलंब शुल्कातही मोठे बदल झाले आहेत. साइटवर काँक्रीट पोहोचल्यावर एका तासाच्या आत ते रिकामे न झाल्यास प्रति तास दोन हजार रुपये दंड साईटधारकाकडून आकारला जाणार आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्यास आरएमसीच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते.
– प्रदीप वाल्हेकर, अध्यक्ष, आरएमसी असोसिएशन






