MPCB Warning – नदीमध्ये, तलावामध्ये दूषित पाणी सोडले जाते. त्यावर उपाय म्हणून एचटीपी प्लँट कार्यान्वित करण्याचे निर्देश महापालिकांना दिले आहेत. तरीही महापलिका जर हे काम करत नसेल, तर त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू शकतो, असा इशारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिला आहे. पुण्यात पर्यावरण परिषदेच्या उद्घाटनाला कदम उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्लॅस्टिक रिसायकलिंग असोसिएशनने प्रदर्शन भरवले होते. त्यात जगभरातील बरेच तंत्रज्ञान पाहायला मिळाले. त्याच अनुषंगाने पुढे महाराष्ट्रभर प्लॅस्टिक किंवा अन्य रीसायकलिंगच्या गोष्टी असतील, त्यावर भर देण्यासाठी रीसायकलिंग शो सुरू केला असून, त्याची सुरुवात पुण्यातून झाल्याची माहिती कदम यांनी दिली. बांधकामासाठी एमपीसीबीची नियमावली आहे, तशीच आरएमसी प्लँटसाठीही नवी नियमावली केली आहे. पुणे महापालिका यामुळे प्रदूषण कमी झाले आहे, असा दावा कदम यांनी केला. भविष्यात आणखी सुधारणा होणार आहे. डीप क्लिन ड्राइव्हच्या ऑटोमेटेड मशिन्स पुणे आणि पिंपरी चिंचवड महापलिकेला देणार आहोत. सांडपाण्यासाठी जोपर्यंत एचटीपी पूर्ण करत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम मिळणार नाही. मोठ्या सोसायट्यांमध्ये एचटीपी प्लँट आहेत, ते चालवले जातात का ते पाहण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट सुरू केले आहे. त्यात दोषी आढळलेल्या सोसायटीवर कारवाई होणार आहे. एमपीसीबीचे काम हे प्रदूषण नियंत्रणाचे आहे. ज्या ठिकाणी आरएमसी प्लँट आहेत त्याची जागा, त्या बांधायची परवानगी देण्याचे किंवा तपासणी करण्याची जबाबदारी आमची नाही, असे कदम म्हणाले. मनुष्यबळ वाढणार एमपीसीबीचा एखादा अधिकारी जर कोणाला पाठीशी घालत असेल तर त्याच्यावरही कारवाई होईल. १७ ऑक्टोबरला आम्ही नवे नियम लागू केले आहेत त्याचे पालन न केल्यास कारवाई होईल. एमपीसीबीचे मनुष्यबळ वाढविण्यासाठी परवानगी मिळाली असून, तीन महिन्यांत नवी मनुष्यबळाची भरती होईल, तसेच पुण्यातील एमपीसीबीचे कार्यालय बारामतीला हलवणार नाही, असेही कदम यांनी स्पष्ट केले.