IPL 2025 Riyan Parag : १० षटकार, १४ चौकार… ६४ चेंडूत १४४ धावा, आयपीएल २०२५ पूर्वी राजस्थानच्या युवा फलंदाजाची वादळी खेळी

Riyan Parag smashed 64 ball 144 runs inning ahead IPL 2025 : आयपीएल २०२५ सुरू होण्याच्या अगदी आधी, राजस्थान रॉयल्सच्या स्टार फलंदाजाने आपल्या तुफानी फलंदाजीने गोलंदाजांची झोप उडवली आहे. १४ कोटी किमतीच्या या खेळाडूने इन्ट्रा स्क्वॉड सामन्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून रियान पराग आहे. या हंगामात सर्वांच्या नजरा रियान परागवर असणार आहेत.
राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी रियान परागला कायम ठेवले होते. गेल्या हंगामातही या युवा फलंदाजाने आपल्या संघासाठी दमदार फलंदाजी केली होती. त्याने आयपीएल २०२४ च्या १६ सामन्यांमध्ये ५७३ धावांची उधळण केली होती. आता आयपीएल २०२५ सुरू होण्यापूर्वी, रियान परागने इन्ट्रा स्क्वॉड सामन्यात वादळी फलंदाजी करत धुमाकूळ घातला आहे. रियानने फक्त ६४ चेंडूंचा सामना करत १४४ धावांची तुफानी खेळी केली.
रियान परागने चौकार-षटकारांचा पाडला पाऊस –
Riyan Parag smashed 144* runs from just 64 balls including 16 fours & 10 sixes in the Practice match of Rajasthan Royals 🤯👌 pic.twitter.com/R4hdIVJQih
— Johns. (@CricCrazyJohns) March 19, 2025
या सामन्यात कोणताही गोलंदाज रियानला बाद करू शकला नाही. त्याने आपल्या या खेळीत १६ चौकार आणि १० उत्तुंग षटकारांचा पाऊस पाडला. राजस्थानच्या या स्टार फलंदाजाने १४४ पैकी फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने १२४ धावा केल्या. म्हणजे रियानने फक्त २६ चेंडूत १२४ धावा केल्या. इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामापूर्वी रियानचा हा उच्च दर्जाचा खेळ पाहून राजस्थान संघाला खूप आनंद होईल. त्याच वेळी, रियानने विरोधी संघाच्या गोलंदाजांसाठी आपण धोक्याची घंटा असल्याचे सिद्ध केले आहे.
रियान परागची बॅट मागील हंगामात तळपली होती –
आयपीएल २०२४ मध्ये रियान परागची बॅट खूप तळपली होती. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना, रियानने १६ सामन्यांमध्ये ५२.०९ च्या सरासरीने आणि १४९ च्या स्ट्राईक रेटने ५७३ धावा केल्या होत्या. इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामात रियानने चार अर्धशतके झळकावली होती. रियानच्या शानदार फलंदाजीमुळे राजस्थान संघ दुसऱ्या क्वालिफायरपर्यंत पोहोचला होता.
हेही वाचा – IPL 2025 : ‘या’ गोलंदाजाचा सामना करताना ख्रिस गेलचे पाय थरथर कापायचे; के. श्रीकांतचे मोठे वक्तव्य
यानंतर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये संघाला सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. यावेळी राजस्थान संघ कागदावर खूपच मजबूत दिसत आहे. राजस्थानने आपल्या संघात जोफ्रा आर्चर, महेश तिक्षणा, वानिंदू हसरंगा यांसारख्या बलाढ्य गोलंदाजांचा समावेश केला आहे. तर, फलंदाजीत, संघाने नितीश राणा आणि १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी यांचा संघात समावेश केला आहे.





