River Pollution: गावाचा कचरा थेट नदीपात्रात; प्रशासनाच्या ‘या’ चुकीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात
River Pollution: जागेअभावी भोलावडे ग्रामपंचायत क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन कोलमडले; कचऱ्याचे ढीग नदीच्या पाण्यात मिसळत असल्याने जैवविविधता धोक्यात.

River Pollution – भोर तालुक्यातील भोलावडे ग्रामपंचायत क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध नसल्याने कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दररोज गोळा केला जाणारा कचरा गावाशेजारील नदीपात्राजवळ उघड्यावर टाकला जात असून, तो नदीच्या पाण्यात मिसळत आहे. यामुळे परिसरातील जैवविविधतेसह नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार ओला, सुका, सॅनिटरी आणि वैद्यकीय कचऱ्याचे वर्गीकरण करणे बंधनकारक आहे. असे असतानाही, भोलावडे येथे सर्व प्रकारचा कचरा एकत्रित करून गावाजवळून वाहणाऱ्या नदीकाठावर टाकला जात आहे. गावाच्या स्मशानभूमीजवळच कचऱ्याचे मोठे ढीग साचल्याने परिसराला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले आहे. हा साचलेला कचरा दररोज पेटवला जात असल्याने दिवसभर परिसरात धुराचे लोट पसरतात.
तसेच भटक्या कुत्र्यांचा आणि डुकरांचा सुळसुळाट वाढल्याने हा कचरा सर्वत्र विखुरला जात असून, परिसरात दुर्गंधी पसरल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत भोलावडेचे प्रभारी सरपंच प्रशांत पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता, “गावामध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी हक्काची जागा उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव कचरा संबंधित ठिकाणी टाकावा लागत आहे. तरीही नागरिकांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे,” असा दावा त्यांनी केला.
“दिवसेंदिवस भोलावडे ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकसंख्या आणि नागरीकरण वाढत असल्याने कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. गावाच्या उत्तरेकडे वन विभागाची जमीन असून, तिथे कचरा टाकण्यास वन विभागाचा अटकाव आहे. कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी ही जागा मिळावी, याकरिता शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र, अद्याप शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.”
– प्रवीण जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य.




