Mula Mutha River – पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नदीपात्रात कोणतीही प्रक्रिया न करता दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याच्या निषेधार्थ एमआयटी एडीटी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व कर्मचार्यांनी बुधवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तीव्र निदर्शने केली. या आंदोलनात एमआयटी विश्वशांती गुरुकुल, एमआयटी ज्युनिअर महाविद्यालय तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठातील हजारो विद्यार्थी व निवासी कर्मचार्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्थानिक ग्रामपंचायतींची उदासीनता आणि जिल्हा प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, नदीपात्रात दररोज 35 ते 40 ट्रॅक्टर कचरा थेट टाकला जात असून त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. हा प्रकार तातडीने थांबवावा तसेच विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच अशी वाहने आडवावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली. याबाबत स्थानिक पोलिसांनाही निवेदन देण्यात आले. एमआयटी शैक्षणिक संकुलात सध्या देश-विदेशातील सुमारे 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी सुमारे 5 हजार विद्यार्थी व 1 हजार कर्मचारी परिसरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे हा प्रश्न आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. मुळा-मुठा नदी प्रदूषण कचर्याच्या ढिगांना भीषण आग 26 फेब्रुवारी 2026 रोजी नदीपात्रात साचलेल्या कचर्याला भीषण आग लागली होती. ही आग तब्बल चार दिवस धुमसत राहिल्याने परिसरात विषारी धुराचे प्रचंड लोट पसरले. 27 फेब्रुवारी रोजी 6 ते 7 विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. वसतिगृहातील विद्यार्थी व कर्मचारी यांनाही डोळ्यांची जळजळ, घसा बसणे व श्वास घेण्यास त्रास जाणवला. आग विझविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) एकमेव अग्निशमन बंब व विद्यापीठातील 25 ते 30 कर्मचार्यांनी पाच दिवस प्रयत्न केले. 2 मार्च रोजी ही आग पूर्णतः नियंत्रणात आली. “गेल्या काही वर्षांपासून लोणी-काळभोर, कदमवाकवस्ती आदी गावांकडून दररोज 35 ते 40 ट्रॅक्टर कचरा नदीपात्रात टाकला जात आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले असून जलचरांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे. या प्रदूषणामुळे पुणे शहराची प्रतिमा मलीन होत आहे.” – दादासाहेब भोसूरे (विद्यार्थी प्रतिनिधी) “नदीपात्रात कचर्याचे डोंगर उभे राहिले असून सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत आहेत. विषारी धुरामुळे विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास होत आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अवैध कचरा टाकणे थांबवावे आणि ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून द्यावी.” – मुग्धा सोनवणे (विद्यार्थिनी) “नदीपात्रात थेट टाकला जाणारा कचरा, त्याला लागणार्या आगी आणि विषारी धुरामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या आंदोलनातून कचरा टाकणे तातडीने थांबविण्याची ठाम मागणी करण्यात आली. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ग्रामपंचायतींना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.” – डॉ. महेश चोपडे (कुलसचिव)