PMC Fine – महापालिकेकडून शहर स्वच्छतेसाठी जनजागृती केली जात असतानाच, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या पुणेकरांची संख्या वाढत आहे. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत महापालिकेकडून शहरात अस्वच्छता करण्यास जबाबदार असलेल्या ५३ हजार ३९३ पुणेकरांवर कारवाई करीत त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ७७ लाख ५० हजार ३५२ रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या ३८ हजार ३०४ नागरिकांकडून सर्वाधिक २ कोटी १७ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेच्या या कारवाईत रस्त्याकडेला थुंकणे, लघवी करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, अस्वच्छता करणे अशा वेगवेगळ्या १३ प्रकारच्या बाबींवर कारवाई करण्यात येते. पुणे घनकचरा महापालिकेकडून १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वतंत्र १५ दक्षता पथकांची स्थापना करण्यात आली असून, ही पथके दिवसभर आपल्या-आपल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत फिरून कारवाई करतात. याशिवाय नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या आधारेही संबंधितांवर कारवाई करून दंड वसूल केला जातो. जनजागृतीची गरज… महापालिकेने नेमलेल्या पथकांकडून शहरातील काही ठराविक भागांतच कारवाई होते, त्यामुळे अशा भागांमध्ये जनजागृती केल्यास अस्वच्छतेला आळा बसू शकतो. विशेष म्हणजे, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेकडून जनजागृतीसाठी प्रामुख्याने सार्वजनिक भिंतींवर तसेच रेडिओवर जाहिराती केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात सर्वच क्षेत्रीय कार्यालयांत मोठ्या सोसायट्या तसेच वस्ती पातळीवर लक्ष देणे गरजेचे ठरत आहे. पुणेकरांनी भरलेला एकूण दंड -सार्वजनिक ठिकाणी थुंकणे : ८ लाख ४६ हजार -रस्त्यावर लघवी करणे : १६ लाख ९३ हजार १०० -कचरा जाळणे : ३ लाख २० हजार -कचरा वर्गीकरण न करणे : १० लाख १८ हजार ७८० -अस्वच्छता करणे : २ कोटी १७ लाख २० हजार -बल्क वेस्ट जनरेटर दंड : ५ लाख ८३ हजार -बांधकाम राडारोडा : ३७ लाख २८ हजार -प्लास्टिक विक्री : ७१ लाख १० हजार -बायोमेडिकल वेस्ट : ३ लाख १३ हजार