IND vs ENG : लीड्स कसोटीत ऋषभ पंतची कमाल; शतकानंतर यष्टीमागेही केला मोठा पराक्रम

IND vs ENG Rishabh Pant 150 catches in test : लीड्स येथील कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला ४६५ धावांवर रोखत पहिल्या डावाच्या जोरावर ६ धावांची आघाडी घेतली. भारताचा पहिला डाव ४७३ धावांत संपुष्टात आला होता. दरम्यान यष्टीरक्षक आणि उपकर्णधार ऋषभ पंतने दमदार कामगिरी केली. ऋषभ पंतने शानदार शतक झळकावले होते. आता लीड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच २२ जून रोजी, ऋषभ पंतने यष्टीमागे एक खास कामगिरी केली.
ऋषभ पंतने कसोटीत केला खास पराक्रम –
इंग्लंडच्या पहिल्या डावात प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने ऑली पोपचा झेल घेतला. यासह पंतने कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून १५० झेल पूर्ण केले. पंतने त्याच्या ८६ व्या कसोटी डावात हा विक्रम केला आहे. त्याचबरोबर यामध्ये १५ स्टंपिंग देखील समाविष्ट आहेत. ऋषभ पंत हा कसोटी क्रिकेटमध्ये १५० किंवा त्याहून अधिक झेल घेणारा तिसरा भारतीय यष्टीरक्षक आहे.
Milestone Alert 🚨
Vice-captain Rishabh Pant completes 1⃣5⃣0⃣ catches in Test cricket 👏👏
Updates ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#TeamIndia | #ENGvIND | @RishabhPant17 pic.twitter.com/6ANBpkgmhO
— BCCI (@BCCI) June 22, 2025
या बाबतीत टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पहिल्या क्रमांकावर आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून २५६ झेल घेतले आहेत आणि ३८ स्टंपिंग देखील केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक म्हणून सय्यद किरमानी यांच्या नावावर १६० झेल आणि ३८ स्टंपिंग आहेत.
हेही वाचा – IND vs ENG : बुमराहने रचला इतिहास; इंग्लंडचा धुव्वा उडवत ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच आशियाई गोलंदाज
ऋषभ पंत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर विराजमान –
ऋषभ पंतचा यष्टीरक्षक म्हणून आणखी एक खास विक्रम आहे. त्याने एका कसोटी डावात सहा फलंदाजांना बाद केले आहे आणि तो भारतीय यष्टीरक्षकांमध्ये संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. सय्यद किरमाणी, महेंद्रसिंग धोनी आणि वृद्धिमान साहा यांनीही ही कामगिरी केली आहे. ऋषभ पंतने २०१८ मध्ये नॉटिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून तो क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्वरूपात भारतासाठी चमकदार कामगिरी करत आहे.
हेही वाचा – IND vs ENG : ब्रूक-सिराज भिडले! लीड्स कसोटीत तणावपूर्ण शाब्दिक चकमक, VIDEO व्हायरल
कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी भारतीय यष्टीरक्षक:
- महेंद्र सिंह धोनी: ९० कसोटी, २५६ झेल, ३८ स्टम्पिंग
- सैयद किरमानी: ८८ कसोटी, १६० झेल, ३८ स्टम्पिंग
- ऋषभ पंत: ४४* कसोटी, १५० झेल, १५ स्टम्पिंग
- किरण मोरे: ४९ कसोटी, ११० झेल, २० स्टम्पिंग
- नयन मोंगिया: ४४ कसोटी, ९९ झेल, ८ स्टम्पिंग





