Rinku Singh : न्यूझीलंड मालिकेपूर्वी रिंकू सिंग सापडला अडचणीत! पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

Rinku Singh Controversy about Hanumanji AI video : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिनिशर रिंकू सिंग सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. २१ जानेवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होत आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या रिंकू सिंगवर आता धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याच्याविरोधात अलिगड येथे पोलीस तक्रारही दाखल झाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
रिंकू सिंगने नुकताच सोशल मीडियावर एक ‘AI’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) द्वारे तयार केलेला व्हिडीओ (रील) शेअर केला होता. या रीलमध्ये त्याने आपल्या यशाचे श्रेय देवाला दिले आहे. मात्र, या रीलमधील चित्रिकरणावरून वाद निर्माण झाला आहे. या व्हिडीओमध्ये भगवान हनुमान, भगवान विष्णू, भगवान शिव आणि भगवान गणेश यांना एका कारमध्ये बसलेले दाखवण्यात आले असून, त्यांच्या डोळ्यांवर काळा चष्मा असल्याचे दिसते. या व्हिडिओमध्ये मध्येच रिंकू सिंग मैदानात षटकार मारतानाचे दृश्यही जोडण्यात आले आहे.
करणी सेनेची आक्रमक भूमिका –
Breaking News : क्रिकेटर रिंकू सिंह की देवताओं वाली AI पोस्ट पर विवाद..सोशल मीडिया पर हुए ट्रोल | @rinkusingh235 #RinkuSingh #TopNews #BreakingNews #News18UP pic.twitter.com/Aycp37OctF
— News18 Uttar Pradesh (@News18UP) January 19, 2026
रिंकू सिंगने शेअर केलेल्या या रीलमुळे हिंदू संघटनांमध्ये संतापाची लाट आहे. करणी सेनेने या रीलवर तीव्र आक्षेप घेत अलिगडमधील सासनी गेट पोलीस ठाण्यात रिंकू सिंहविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे. देवांचे अशा प्रकारे ‘मॉडर्न’ रूपात प्रदर्शन करणे हे अपमानजनक असून, यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा दावा करणी सेनेने केला आहे. तसेच रिंकू सिंहने याप्रकरणी सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सोशल मीडियावर मतमतांतरे –
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काही चाहत्यांनी रिंकूची बाजू सावरून धरली असून, त्याने केवळ भक्तीपोटी हे रील बनवल्याचे म्हटले आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला देवांच्या अयोग्य चित्रिकरणावरून त्याच्यावर सडकून टीका केली जात आहे.
रिंकूची अलीकडची कामगिरी –
रिंकू सिंग अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश (UP) संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती, मात्र सौराष्ट्रकडून १७ धावांनी पराभूत झाल्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले. या स्पर्धेत रिंकूने वैयक्तिकरित्या काही चांगल्या खेळी केल्या होत्या.
हेही वाचा – IND vs NZ : न्यूझीलंडचा ऐतिहासिक ‘मालिका विजय’! ३७ वर्षानंतर पहिल्यांदाच भारतात फडकवला झेंडा
आगामी टी-२० मालिकेसाठी तो सज्ज असतानाच आता या कायदेशीर कचाट्यामुळे त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता या प्रकरणावर रिंकू सिंग स्वतः काय स्पष्टीकरण देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





