नव्या प्रचाराच्या नव्या संकल्पना, सोशल मीडियावर इच्छुकांची वाढती उपस्थिती

कान्हे – जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अधिकृत तारखा जरी अद्याप जाहीर झालेल्या नसल्या, तरी मावळ तालुक्यात मात्र निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत.
पारंपरिक राजकीय वातावरणाची जागा आता हळूहळू डिजिटल प्रचाराने घेतली असून, इच्छुक उमेदवारांनी समाजमाध्यमांवर आघाडी घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. डिजिटल समाज माध्यमांवरून इच्छुक उमेदवार आपली उपस्थिती ठळक करत असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्या संकल्पनांचा वापर केला जात आहे.
पूर्वी निवडणुकांच्या चर्चा गावच्या चावडीवर, चहाच्या टपरीवर किंवा बैठकीत ऐकायला मिळत होत्या. मात्र सध्याच्या घडीला मोबाईल हेच राजकीय व्यासपीठ बनले आहे.
मावळ तालुक्यातील विविध गावांमधून जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी इच्छुक उमेदवारांनी समाजमाध्यमांवरून भावी जिल्हा परिषद सदस्य, भावी पंचायत समिती सदस्य, आपुलकीचा नेता, जनतेतल्या हक्काचा प्रतिनिधी, अशा आशयाच्या पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे. या पोस्टमधून आपणच आगामी निवडणुकीतील प्रमुख चेहरा आहोत, असे अप्रत्यक्षपणे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेला प्रचार केवळ पोस्ट किंवा फोटोपुरताच मर्यादित राहिलेला नाही. अनेक इच्छुक उमेदवार गावभेटी, शेतकरी संवाद, महिलांसोबत चर्चा, युवकांशी संवाद असे कार्यक्रम प्रत्यक्षात राबवत असून, त्याचे व्हिडीओ काही वेळातच समाजमाध्यमांवर अपलोड केले जात आहेत.
आकर्षक संगीत, प्रभावी ओळी, भावनिक संवाद आणि ठळक संदेश यामुळे हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे मर्यादित परिसरातील कार्यक्रम क्षणार्धात तालुकाभर पोहोचत असल्याचे चित्र आहे.
या डिजिटल प्रचाराचा परिणाम मतदारांवरही स्पष्टपणे जाणवत आहे. अनेक मतदार सोशल मीडियावर या इच्छुक उमेदवारांचे फोटो आणि व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया देत आहेत. कोणी शुभेच्छा देत आहे, तर कोणी मुद्दाम अतिशयोक्तीपूर्ण कौतुक करत नेतृत्वाची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
काही ठिकाणी तर एकाच उमेदवाराच्या बाजूने सातत्याने सकारात्मक कमेंट्स केल्या जात असल्याचेही दिसून येते. त्यामुळे सोशल मीडिया हे आता केवळ प्रचाराचे साधन न राहता, मतदारांसाठी एक प्रकारचा डिजिटल विरंगुळा ठरत आहे.
सोशल मिडियावर अप्रत्यक्ष स्पर्धा
मावळ तालुक्यातील अनेक भागांत एकाच राजकीय पक्षातून दोन, तीन किंवा चार इच्छुक असल्याचे चित्र आहे. या इच्छुकांमध्ये थेट संघर्ष न दाखवता, सोशल मीडियावर अप्रत्यक्ष स्पर्धा सुरू आहे. कोणाला जास्त लाईक्स मिळतात, कोणाचा व्हिडीओ जास्त शेअर होतो, कोणाच्या पोस्टवर पक्षातील नेत्यांची प्रतिक्रिया येते.
यावरून राजकीय गणितं मांडली जात आहेत. काही इच्छुकांनी तर आपल्यालाच तिकीट मिळणार असल्याचा संकेत देणाऱ्या पोस्ट टाकत आत्मविश्वास दाखवला आहे. तर काही ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीची शक्यता सूचक पद्धतीने मांडणारे संदेशही समाजमाध्यमांवर दिसू लागले आहेत.
डिजिटल प्रचारात तरुणाई सक्रिय
बदलत्या प्रचारपद्धतीत तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. इच्छुक उमेदवारांच्या मागे तरुणांचा मोठा गट डिजिटल प्रचारात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. मोबाईलवर शूटिंग करणे, व्हिडीओ एडिट करणे, त्यावर साजेसे संगीत लावणे, योग्य कॅप्शन आणि हॅशटॅग वापरणे या साऱ्या गोष्टी युवकांकडून केल्या जात आहेत.
आजचा युवक केवळ कार्यकर्ता न राहता, डिजिटल स्ट्रॅटेजिस्टच्या भूमिकेत उतरल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे ग्रामीण भागातही प्रचाराची आधुनिक शैली झपाट्याने रूजताना दिसत आहे.
कमेंट्सच्या माध्यमातून कल ओळखण्याचा प्रयत्न
राजकीय संवादाच्या स्वरूपातही मोठा बदल घडताना दिसत आहे. सोशल मीडिया हे आता मतदारांच्या मानसिकतेचा आरसा बनले आहे. कोणत्या मुद्द्यावर जास्त चर्चा होते, कोणत्या विषयावर नाराजी व्यक्त केली जाते, कोणत्या गोष्टी लोकांना भावतात, याचा अंदाज इच्छुक उमेदवार घेत आहेत.
पोस्टवरील प्रतिक्रिया, शेअर आणि कमेंट्स यातून लोकांचा कल ओळखण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात प्रचाराचे मुद्दे ठरवताना या डिजिटल संकेतांचा मोठा प्रभाव राहणार, हे नाकारता येत नाही.





