Rinku Rajguru: ‘राजसा जवळी जरा बसा!’ रिंकू राजगुरूची जबरदस्त लावणी; म्हणाली, “फक्त दोन तासांत….”

Rinku Rajguru : ‘सैराट’मधील आर्चीच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू अभिनयासोबतच नृत्यातही तितकीच पारंगत आहे, हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. रिंकूने अलीकडेच लता मंगेशकर यांनी गायलेल्या अजरामर लावणी गीतावर “राजसा जवळी जरा बसा” अप्रतिम नृत्य सादर केलं असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
नऊवारी साडी, डिझायनर ब्लाऊज, नाकात नथ, गळ्यात हार आणि पायात घुंगरू अशा पारंपरिक मराठमोळ्या लूकमध्ये रिंकूने लावणी सादर केली आहे. या सादरीकरणात प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांनी तिला साथ दिली आहे. दोघांच्याही तालबद्ध हालचालींनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
View this post on Instagram
या लावणीविषयी भावना व्यक्त करताना रिंकू म्हणाली,
“लावणी हा आपल्या पिढ्यांचा वारसा आहे. लहानपणापासून लावणीशी जोडलेल्या अनेक गोड आठवणी आहेत. बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा लावणी करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. हा व्हिडीओ तुमच्याबरोबर शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. थँक्यू आशिष पाटील… तुझ्यामुळे माझ्या बालपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. विशेष म्हणजे ही लावणी मी फक्त आवडीपोटी, अवघ्या दोन तासांच्या सरावात सादर केली आहे.”
रिंकूच्या या नृत्यसादरीकरणावर मराठी सिनेसृष्टीतील ‘डान्सिंग क्वीन’ अमृता खानविलकरने “Oh love love” अशी कमेंट केली आहे. याशिवाय नेटकऱ्यांनीही भरभरून कौतुक केलं असून, “अतिसुंदर”, “उफ्फ… किती छान नाचलीस”, “काय अदा, काय नजाकत!” अशा प्रतिक्रिया कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, नुकतीच ती ‘आशा’ या चित्रपटात झळकली होती. लवकरच ती ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या मल्टीस्टारर सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.




