पुण्यात सैराट स्टाईल थरार..! आंतरजातीय दाम्पत्यावर हल्ला, पत्नीचे अपहरण करून नवऱ्याला बेदम मारहाण

Pune Crime News : पुण्यातील खेड तालुक्यातील खरपुडी गावात रविवारी (३ ऑगस्ट) सायंकाळी एक धक्कादायक आणि संवेदनशील घटना घडली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी या दाम्पत्यावर प्राजक्ताच्या कुटुंबीयांनी आणि काही नातेवाईकांनी हल्ला केला आहे.
या हल्ल्यात विश्वनाथला बेदम मारहाण करण्यात आली, तर प्राजक्ताचे अपहरण करून तिला अज्ञात ठिकाणी घेऊन जाण्यात आले. या प्रकरणाने खरपुडी गावात आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. खेड पोलिसांनी १५ जणांविरुद्ध अपहरण आणि गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून, तपास आणि प्राजक्ताला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
विश्वनाथ आणि प्राजक्ता यांनी काही काळापूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांचा आंतरजातीय विवाह हा प्राजक्ताच्या काही नातेवाईकांना मान्य नव्हता, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव होता. दोघेही खरपुडी गावात एकत्र राहत होते आणि आपले आयुष्य सामान्यपणे जगण्याचा प्रयत्न करत होते.
मात्र, रविवारी सायंकाळी प्राजक्ताचे भाऊ, आई आणि इतर काही नातेवाईकांसह १५ जणांचा समूह खरपुडी गावात आला. त्यांनी विश्वनाथवर अचानक हल्ला केला आणि त्याला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी प्राजक्ताला जबरदस्तीने गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी घेऊन जाण्यात आले. या हल्ल्यामुळे विश्वनाथ गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, विश्वनाथच्या तक्रारीनंतर खेड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्राजक्ताचा भाऊ, आई आणि इतर १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्राजक्ताचा शोध घेण्यासाठी विशेष पथके स्थापन केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांच्या मोबाइल लोकेशनचा तपास सुरू आहे.
खेड पोलिसांनी सांगितले की, “आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल आणि प्राजक्ताला सुखरूप परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.” सामाजिक तणाव टाळण्यासाठी खरपुडी गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.





