अमित शहा यांच्या विरोधातही आणणार हक्कभंग ठराव; जयराम रमेश यांनी दिली नोटीस

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात हक्कभंग ठराव आणण्याच्या हालचाली कॉंग्रेसने सुरू केल्या. त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी शुक्रवारी नोटीस दिली. केरळच्या वायनाडमध्ये नुकतीच भूस्खलनाने मोठी हानी झाली. त्यासंदर्भात शहा यांनी राज्यसभेत निवेदन दिले. त्यांनी केंद्र सरकारने केरळला पूर्वसूचना दिल्याचे म्हटले. त्यावर रमेश यांनी आक्षेप घेतला आहे.
शहा यांनी केलेले वक्तव्य खोटे असल्याचे सिद्ध झाल्याचा दावा त्यांनी केला. शहा यांनी राज्यसभेची दिशाभूल केली. ती कृती हक्कभंग असून राज्यसभेचा अवमान करणारी आहे, अशी भूमिका रमेश यांनी घेतली. तसेच, राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याकडे नोटीस सादर केली. याआधी कॉंग्रेसचे खासदार चरणजितसिंग चन्नी यांनी लोकसभेत मोदींविरोधात हक्कभंग ठराव आणण्यासाठी नोटीस दिली.
भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांचे भाषण मोदींनी सोशल मीडियावरून शेअर केले. त्या भाषणावेळी ठाकूर यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जातीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते वक्तव्य लोकसभेच्या कामकाजातून वगळण्यात आले. मात्र, त्या वक्तव्याचाही समावेश असणारे भाषण शेअर करण्याच्या मोदींच्या कृतीवर कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे.





