मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत मुहूर्त ठरला असून, ३ जानेवारी रोजी पहिली जाहीर सभा होणार आहे. या सभेने मुंबईतील निवडणूक रणधुमाळीला औपचारिक सुरुवात होणार आहे. विशेष बाब म्हणजे, या पहिल्याच जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ हे प्रमुख वक्ते म्हणून एकाच व्यासपीठावरून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. त्यामुळे महायुतीची ताकद, एकजूट आणि आत्मविश्वास मुंबईकरांसमोर ठळकपणे मांडला जाणार आहे. महायुतीच्या या पहिल्या सभेकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. मुंबईतील जागावाटप, उमेदवार निवड आणि स्थानिक प्रश्नांवर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला या व्यासपीठावरून प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. याच सभेत महायुतीकडून प्रचाराची दिशा, विकासाचा अजेंडा आणि ‘मुंबईचं पुढील पाच वर्षांचं व्हिजन’ स्पष्ट केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्यासाठी आणि उमेदवारांच्या प्रचाराला बळ देण्यासाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भाजपा, शिवसेना तसेच महायुतीतील अन्य घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने वरळी डोममध्ये शक्तिप्रदर्शनाचे चित्र दिसण्याची दाट शक्यता आहे.