Pimpri News | भातलावणी अंतिम टप्प्यात, पावसामुळे रोपांची टंचाई..

प्रभात वृत्तसेवा
पवनानगर- यंदा भातलावणीस मोठ्या नैसर्गिक अडचणींचा सामना करत शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर सक्रिय झाल्याने भात पेरणीस विलंब झाला. सततच्या पावसामुळे शेतीची मशागत रखडली आणि शेतकऱ्यांना चिखलातच पेरणी करावी लागली. परिणामी भात रोपांची वाढ खोळंबली, काही ठिकाणी रोपे कुजली तर काहींचे बियाणे वाहून गेले. रोपांची टंचाई निर्माण झाली असून, यावर्षी मावळात भात उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मे अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीस मावळात भात पेरणीस सुरुवात होते. मात्र यावर्षी पावसाने मे महिन्याच्या उत्तरार्धातच जोर धरला. सततच्या पावसामुळे शेतीत पाणी साचले आणि मशागतीची कामे व पेरणी रखडली. शेतकऱ्यांना धूळ वाफ्याऐवजी चिखलातच पेरणी करावी लागली. काही भागांत बियाणे वाहून गेल्याने दुबार पेरणीची वेळ आली. परंतु दुबार पेरणीसुद्धा पुन्हा पावसामुळे अडथळ्यात आली.
मावळातील पवना, आंद्रा आणि इंद्रायणी नद्यांच्या खोऱ्यात विशेषतः पवन मावळ, नाणे मावळ आणि आंदर मावळ डोंगरी व पश्चिम भागात भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. पवना, आढले, वलवण, शिरोता, वडीवळे, आंद्रा यासारखी धरणे आणि नद्या या क्षेत्राला सिंचनाचे भरपूर पाणी पुरवतात. त्यामुळे दरवर्षी मुबलक उत्पादन मिळते. मात्र यंदा पावसाचा अनियमित आणि अत्यधिक प्रवाह शेतीसाठी लाभदायक न ठरता अडथळा ठरला आहे.मावळात यंदा भात लावणी अखेर अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, सततचा पाऊस, रोपांची टंचाई आणि दुबार पेरणी यामुळे बळीराजा अडचणीत आहे. भाताचे एकूण उत्पादन घटण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम तांदळाच्या दरांवर होणार असल्याचे चित्र आहे.
तांदळाच्या दरात वाढ होण्याची शक्यता
मावळ तालुका हा पारंपरिक भातशेतीसाठी ओळखला जातो. येथे आंबेमोहर, इंद्रायणी, कोळम, साळ यासारखे पारंपरिक भात वाण तसेच रूपाली, सोनम, सुरूची, फुले समृद्धी, तृप्ती यासारखे संकरित वाण मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. यंदा लावणी क्षेत्र कमी झाल्यामुळे सर्वच वाण्यांच्या उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे तांदळाचे दर बाजारात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसाने निर्माण केलेले अडथळे
पेरणीपूर्वी आणि दरम्यान सतत पावसामुळे शेतीत पाणी साचले परिणामी पावसामुळे ट्रॅक्टर व बैलजोडीने मशागत करणे अशक्य झाले. अनेक ठिकाणी बियाणे वाहून गेल्यामुळे पुन्हा पेरणी करावी लागली. भात रोपांची उपलब्धता कमी झाल्याने लागवड क्षेत्रात घट झाली.





