कर्मचाऱ्यांच्या एकत्रित वेतनामध्ये सुधारणा

पुणे – राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा, वसतिगृहे यांमधील कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणाऱ्या एकत्रित वेतनावरील त्याचप्रमाणे मतिमंदांकरीताच्या बालगृहांमधील एकत्रित वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या एकत्रित वेतनामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येत असलेल्या दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा व संलग्न वसतिगृहे यांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध निश्चित करण्यात आलेला आहे.
त्यामधील सफाईगार, पहारेकरी व मदतनीस ही पदे कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या पदांना रुपये २५५०-३२०० या वेतनश्रेणीतील मूळ वेतन अधिक देय महागाई भत्ता यांच्या ५० टक्के एकत्रित वेतन मंजूर करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे ग्रंथपाल, मानद वैद्यकीय अधिकारी, वाचक व पुनर्वसन सामाजिक कार्यकर्ता नि सेवा योजन अधिकारी ही पदे एकत्रित वेतनावर आहेत.
महिला व बाल विकास विभागाकडून हस्तांतरित झालेल्या अनुदानित मतिमंदांसाठीच्या बालगृह संलग्न दिव्यांगांच्या शाळा, कार्यशाळांमधील मानद वैद्यकीय अधिकारी, वाहन चालक व वाहन परिचर ही पदे एकत्रित वेतनावर आहेत. कंत्राटी तसेच एकत्रित वेतनावरील कर्मचाऱ्यांचे वेतन, एकत्रित वेतन सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने निर्णय घेतला आहे.
स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येत असलेल्या दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा व संलग्न वसतिगृहे यांमधील सफाई कामगार, पहारेकरी व मदतनीस या पदांवरील ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन वरील तक्त्यात दर्शविलेल्या “अकुशल” वर्गवारीच्या किमान वेतनापेक्षा कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांचे वेतन संबंधित उपक्रम ज्या परिमंडळाच्या क्षेत्रामध्ये येतो, त्या परिमंडळातील कार्यालयांना अनुज्ञेय असलेल्या दरानुसार निश्चित करण्यात यावे. कामगार आयुक्त यांच्याकडून वर्षातून दोन वेळा जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीकरीता महागाई भत्ता जाहीर केला जातो. त्यानुसार एकूण किमान वेतनाची वर्षातून दोनदा परिगणना करण्यात येणार आहे.





