Tukaram Mundhe : “…पण मला तसे करायचं नाही”; तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम, थेट इशारा दिला..!
प्रशासकीय कार्यालयांमध्ये एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईल किंवा कागदपत्रे पाठवली की काम झालं, अशी मानसिकता काही ठिकाणी दिसून येते. यावर मुंढेंनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.

Tukaram Mundhe : कडक शिस्त, स्पष्टवक्तेपणा आणि कामातील हलगर्जीपणाला अजिबात थारा न देणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मुंढेंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामातील ढिसाळपणा, विभागांमधील समन्वयाचा अभाव, नागरिकांना होणारा त्रास आणि कार्यालयीन शिस्त या मुद्द्यांवर अक्षरश: खडसावल्याचं दिसत आहे. ‘कागदं पळवणं एवढंच आपलं काम नाही, त्यातून रिझल्ट मिळाला पाहिजे’, असं म्हणत त्यांनी प्रशासनाच्या कामकाजाची नेमकी दिशा काय असावी, हे स्पष्ट केलं.
“आपण दहा दिशेला तोंडं करून बसलोय, ते मला नकोय,” असं म्हणत त्यांनी कार्यालयीन कामकाजात परस्पर संवाद आणि समन्वय किती महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट केलं. एका विभागाने दुसऱ्या विभागाशी संपर्क न ठेवता स्वतंत्रपणे काम केल्यास त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
‘कागदं पळवणं एवढंच आपलं काम नाही’
प्रशासकीय कार्यालयांमध्ये एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईल किंवा कागदपत्रे पाठवली की काम झालं, अशी मानसिकता काही ठिकाणी दिसून येते. यावर मुंढेंनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. “कागदं पळवणं एवढंच आपलं काम नाही. त्याच्यावर जे अपेक्षित काम आहे, जे रिझल्ट हवंय, त्यासाठी आपण काम केलं पाहिजे,” असं त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं.
जीन्सवरून कर्मचाऱ्याला सुनावलं…
कामकाजाच्या पद्धतीवरून अधिकाऱ्यांना सुनावल्यानंतर तुकाराम मुंढेंनी कार्यालयातील ड्रेसकोड आणि कर्मचाऱ्यांच्या एकूणच नीटनेटकेपणाचा मुद्दा उपस्थित केला. एका कर्मचाऱ्याने जीन्स परिधान केल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला थेट सुनावलं.
“तुम्ही जीन्सवर आला आहात. तुम्ही इथे फिरायला आला नाहीत,” असं म्हणत त्यांनी कार्यालयात येताना सभ्य आणि नीटनेटके कपडे परिधान करण्याची सूचना केली. विशेष म्हणजे, स्वत:कडेही जीन्स-टीशर्ट भरपूर असल्याचं त्यांनी सांगितलं; कार्यालयात येताना शेविंग करून येणं, नीटनेटकेपणा ठेवणं आणि एकूणच ऑफिसची शिस्त पाळणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
“जरा शिस्त ठेवा. तुम्ही जीन्सवर आला आहात. तुम्ही इथे फिरायला आला नाहीत. माझ्याकडेही जीन्स-टीशर्ट भरपूर आहेत. आता पुन्हा मी वॉर्निंग देणार नाही. आपण ऑफिसमध्ये ऑफिसवेअर घालून यावं. डिसेंट ड्रेस… एवढीच माझी अपेक्षा आहे, घरी आपण मुलांना सांगतोच ना की, बाहेर जाताना कपडे नीट घालून जा. मग स्वत:च्या बाबतीतही त्या गोष्टी पाळल्या पाहिजेत,” असं ते म्हणाले.
कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन शिस्त स्वेच्छेने पाळावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना मुंढेंनी कठोर पाऊल उचलण्याचाही इशारा दिला. “पाळायचं नसेल तर मग मला युनिफॉर्मचा नियम काढावा लागेल. पण मला ते नको आहे, आपण काय शाळेत जात नाही,” असं त्यांनी सुनावलं. त्यामुळे या व्हिडीओमधून तुकाराम मुंढेंची कामाबाबतची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.






