Satara | भविष्य निर्वाह निधीच्या रकमेसाठी निवृत्त कामगारांचा मोर्चा

फलटण, (प्रतिनिधी) – श्री दत्त इंडिया प्रा. लि. साखरवाङी कारखान्यातील सेवानिवृत्त कामगारांची अनेक वर्षे रखङलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळावी या मागणीसाठी सेवानिवृत्त कामगारांनी मोर्चा काढून कारखाना व्यवस्थापनास निवेदन दिले. न्याय न मिळाल्यास अन्यथा ८ आॕगष्ट क्रांतीदिनापासून आमरण उपोषण आणि बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा अंतिम इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आमची थकीत भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. सेवा निवृत्त कामगारांना त्यांच्या हक्काची भविष्याची पुंजी न मिळाल्यामुळे काही कामगार बंधु भगिनी आर्थिक तणावाने गंभीर आजारांना उपचारासाठी पैसे नसल्याने बळी पडले आहेत. मुला मुलींचे शिक्षण, लग्न कार्य, आजारपण, औषधोपचार इत्यादीसाठी आमच्याकडे कोणतेही दुसरे साधन नसल्याने हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
न्य. फलटण शुगर वर्क्स साखरवाडी हा कारखाना देणी न देता बंद पडला. प्राव्हिडंड फंडाच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी कारखाना व्यवस्थापन व आयुक्त प्रा. फंड कोल्हापूर यांच्याकडे सातत्याने पत्र व्यवहार आणि प्रत्यक्ष भेटी घेऊन पाठपुरावा करण्यात आला पण त्याची कोणीही गांभीर्याने दखल घेतली नाही.
कारखाना ताब्यात घेतला त्यावेळी कामगार संघटना तसेच महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष यांची श्री दत्त इंडिया प्रा. लि. व्यवस्थापनाबरोबर चर्चा झाली. त्या वेळेस कामगारांनी विश्वास ठेवला. कायद्याने ही संपूर्ण रक्कम व्याजासह मिळण्याचा कामगारांना हक्क आहे.
फलटण तालुक्याचे लोक प्रतिनिधी मा. श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांनी बंद पडलेला कारखाान पुन्हा चालू करून त्याल उर्जितावस्था आणण्यासाठी अथक प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नाने कारखाना पुन्हा सुरू झाला. तरी त्यांनाही अशी विनंती आहे की त्यांनी या प्रश्नात गांर्भियाने लक्ष घालुन भविष्य निवार्ह निधीची रक्कम मिळवून देऊन कामगारांना न्याय मिळवून द्यावा.
अन्यथा कारखाना कार्यस्थळावर ८ ऑगष्ट क्रांतीदिनापासून कामगार बेमुदत धरणे आंदोलन, आमरण उपोषण करणार आहेत. त्यामध्ये कामगारांचे जीवितास कोणताही धोकास किंवा जीव गमवावा लागल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी कारखाना व्यवस्थापनाची राहिल.





