ST Bus Accident – टेंभुर्णी-कुर्डूवाडी रोडवर तांबवे गावच्या हद्दीत वीटभट्टीजवळ भरधाव एसटी बसने कारला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी (दि. 28) दुपारी सुमारे 2.45 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे फलटण व कोळकी परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अनिल जगन्नाथ यादव (वय 50, व्यवसाय – सलून, रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीतील माहितीनुसार, सुराज्य तालीमचे उस्ताद पैलवान बाळासाहेब महादेव काशिद (वय 57), सनिता बाळासाहेब काशिद (वय 50 दोघे रा. बुवासाहेब नगर, कोळकी, ता. फलटण) तसेच शारदा संभाजी राऊत (वय 65) व मुक्ताबाई कल्याण राऊत (वय 70, दोघी रा. तावशी, ता. इंदापूर) हे सर्वजण माढा येथून टेंभुर्णीकडे मारुती सुझुकी बलेनो (क्र. एमएच 11 सीजी 9066) या कारमधून प्रवास करत होते. दुपारी सुमारे 2. 45 वाजता तांबवे गावच्या हद्दीत विटभटीजवळ टेंभुर्णीकडून येणार्या एसटी बस (एमएच 14 एमएच 0198) वरील चालक जोतीराम भीमराव जाधव (रा. गीतानगर, पणदरे, पुणे) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे व भरधाव वेगात बस चालवली. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या बाहेर काढल्याने समोरून येणार्या बलेनो कारला समोरासमोर जोरदार धडक बसली.या भीषण धडकेत उस्ताद पैलवान बाळासाहेब काशिद, सुनिता काशिद व शारदा संभाजी राऊत हे तिघे गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मृत्यूमुखी पडले. तर मुक्ताबाई कल्याण राऊत या गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बस चालक जोतीराम भीमराव जाधव याच्याविरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोहेकॉ/976 देवकर यांनी गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चौधरी करत आहेत.