Satara | फलटण येथे बौद्ध समाजाचा रविवारी महामेळावा

फलटण, (प्रतिनिधी)- फलटण कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघातील संवाद अभियानास मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बौद्ध समाजातील बांधवांची राजकीय मोट बांधण्यासाठी फलटण येथे बौद्ध समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन रविवार दि. 25 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये करण्यात आले आहे.
या मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या बौद्ध समाजातील घटकाला गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्याची खंत व आपणास डावलले जात असल्याची भावना समाजात निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत बौद्ध समाजाला उमेदवारी मिळावी, यासाठी ‘‘एकच निर्धार, बौद्ध आमदार’‘ अशी प्रतिज्ञा घेत मतदारसंघातील बौद्धांनी संवाद अभियान सुरू केले आहे.
या मतदारसंघातील गावागावांत संवाद अभियानापूर्वी शहर व तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक, कृषी, सहकार, पत्रकारिता क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत एकच निर्धार, बौद्ध आमदार या संकल्पनेचा नारा देण्यात आला.
दि. १३ जुलैपासून आजअखेर रोज सांयकाळी २५– ३० प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ७- ८ वाहनांचा ताफा गावागावांत जात आहे. बैठका होत आहेत. स्थानिक नागरिक या बैठकांना उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. आपल्या समाजाला उमेदवारी मिळाली पाहिजे असा आग्रह करतानाचे चित्र गावागावांत दिसत आहे.
बौद्ध समाजाच्या विविध बैठकांनंतर तालुक्यातील विविध जातीधर्म, राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संपर्क करीत, उमेदवारी मिळवून देण्यासाठी पाठिंबा व्यक्त करण्याचे आभियान सुरू केले आहे.
विडणी, पिंपरद, आसू, गुणवरे, बरड, आंदरूड, तरडगाव, साखरवाडी, आदर्की, वाठार निंबाळकर, राजाळे, उत्तर कोरेगाव यांसह 80 हून अधिक गावांत संवाद अभियानास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. बौद्ध समाजाला उमेदवारी देईल त्या पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार ग्रामीण भागातील तरुण व ज्येष्ठांनी दाखविला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर दि. 25 ऑगस्ट रोजी फलटण येथे बौद्ध समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन केले आहे. संवाद दौऱ्यात ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, सचिन मोरे, शक्ती भोसले, सचिन अहिवळे, मधुकर काकडे, विजय येवले, संजय निकाळजे, राजू मारूडा, सुधीर अहिवळे,
संजय गायकवाड, नंदकुमार मोरे, बी. टी. जगताप, विकास काकडे, दत्ता अहिवळे, संग्राम अहिवळे, दया पडकर, सनी काकडे, हरीष काकडे, संदीप काकडे, उमेश कांबळे, शीतल अहिवळे, शाम अहिवळे, विकी काकडे, महादेव गायकवाड, अमित भोसले, रोहित माने, सागर अहिवळे आदी मान्यवर सहभागी होते.
भीमगीतांचा कार्यक्रम
शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा भीमगीतांचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. त्याचबरोबर नवोदित गायक, संगीतकार व गीतकार सागर भोसले आपले गाणे यावेळी सादर करणार आहेत.





