Satara: महाबँकेच्या वित्तीय समावेशन अभियानाला प्रतिसाद
Satara दीपक पाटील यांनी अभियानातील महत्त्वपूर्ण बाबींची माहिती दिली. आर्थिक साक्षरता वाढवणे, नागरिकांना सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देणे आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण आहे. पात्र नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.

Satara: ग्रामीण भागातील पात्र नागरिकांना बँकिंग सेवा, विमा संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने बँक ऑफ महाराष्ट्रच्यावतीने पाचवड, ता. वाई येथे नुकत्याच झालेल्या वित्तीय समावेशन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशांनुसार देशभरात राबवण्यात येत असलेल्या वित्तीय समावेशन योजनांच्या संतृप्तीकरण अभियानांतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाबँकेचे कार्यकारी संचालक प्रभात किरण यांची प्रमुख उपस्थिती होती. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, गटविकास अधिकारी नारायण घोलप, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे उपमहाप्रबंधक दीपक पाटील, अंचल प्रबंधक राहुल जोशी आणि अंचल उपप्रबंधक अमर मोरे, विविध बँकांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
हे अभियान 31 डिसेंबरपर्यंत राबवण्यात येत आहे. या अंतर्गत पंतप्रधान जनधन योजना, जीवनज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, किसान क्रेडिट कार्ड, नवीन बचत खाती उघडणे, प्रलंबित खात्यांचे पुनर्प्रमाणिकरण, आधार प्रमाणीकरण, सेंट्रल केवायसी, जनधन खात्यास वारस नोंदणी, पीक विमा, डिफ फंड परतावा आदींचा समावेश असल्याचे प्रभात किरण यांनी सांगितले. नागरिकांनी क्रेडिट स्कोअर चांगला राखणे महत्त्वाचे आहे. कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास, भविष्यात कर्ज मिळवताना अनुकूल व्याजदर आणि इतर आर्थिक सुविधा मिळण्यास मदत होते, असे नागेश पाटील यांनी सांगितले.
दीपक पाटील यांनी अभियानातील महत्त्वपूर्ण बाबींची माहिती दिली. आर्थिक साक्षरता वाढवणे, नागरिकांना सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देणे आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण आहे. पात्र नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.
या शिबिरात 27 आदिवासी कुटुंबांची प्रधानमंत्री जनधन खाती उघडून एटीएम कार्डचे वितरण करण्यात आले. त्यांचा सुरक्षा विमा योजनेत समावेश करण्यात आला. या शिबिरात पाचवड, जांब परिसरातील ग्रामस्थ, महिला, उमेद अभियानाचे अधिकारी, कर्मचारी, बँक मित्र सहभागी झाले होते. नीतिराज साबळे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नितीन तळपे यांनी आभार मानले. शिबिरासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी व कर्मचार्यांचे सहकार्य लाभले. बँकांनी उभारलेल्या माहिती व सेवा स्टॉलना मान्यवरांनी भेट दिली.





