Satara | धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवा

दहिवडी, (प्रतिनिधी) – धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी घटनात्मक प्रक्रियेचा अवलंब करुन प्रश्न सोडविण्याची मागणी माण तालुक्यातील बहुजन कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आठ दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत तहसीलदार विकास अहिर यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेली कित्येक दशके धनगर बांधव घटनात्मक आरक्षणासाठी संघर्ष करीत आहेत. गत दहा वर्षात यासाठी तीव्रतेने आंदोलने झाली आहेत, मात्र प्रत्यक्षात हा प्रश्न सुटलेला नाही.
सर्वच राजकीय पक्ष आश्वासन देण्यापलीकडे काही करत नाहीत. सत्ताधारी पक्ष वेगदेगळ्या क्लृप्त्या काढून समाजाला झुलवत ठेवत आहेत. यामुळे धनगर समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. पंढरपूर येथील आंदोलनात दोन कार्यकर्त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी घटनात्मक प्रक्रिया आहे. त्यानुसार राज्य शासनाने आपल्या पातळीवरील निर्णय करून संबंधित कागदपत्रे केंद्र शासनाकडे पाठवायची आहेत.
त्यानंतर केंद्र शासन संसदेच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे अहवाल देते. पुढे राष्ट्रपती नोटिफिकेशन काढून आरक्षणाची अंमलबजावणी करतात. ही प्रक्रिया पार पाडली जावी. केवळ कागदांचा खेळ करुन समाजावर अन्याय करु नये.
यावेळी अर्जुन काळे, बाळराजे विरकर, महेश करचे, डॉ. प्रसाद ओंबासे, राजेंद्र बोडरे, अमृत चौगुले, विलास राजगे, आण्णासो कारंडे, सतीश जानकर, उमेश रामचंद्र महानवर, दादासाहेब माळवदे, शिवाजी बरकडे, एकनाथ वाघमोडे, सचिन पुकळे आदी मान्यवर उपस्थित होते.





