पुणे | धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – धनगर समाजाच्या हक्काचे अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण तातडीने लागू करण्याचा शासन निर्णय तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढावा, या मागणीसाठी सकल धनगर समाजातर्फे पुण्यात ढोलवादन आंदोलन करण्यात आले.
सारसबागेजवळील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याला अभिवादन करून धनगर समाजबांधवांनी एसटी आरक्षण लागू करण्याची मागणी केली. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील शेकडो धनगर बांधव, भगिनी यामध्ये सहभागी झाले होते. समन्वयक अॅड. विजय गोफणे, सोमनाथ
अनिकेत कवाने, डी. बी. नाईक, मधुसूदन बरकडे, योगेश खरात, महादेव वाघमोडे, विष्णुदास गावडे, सुनंदा गडदे, पिंटू कोकरे, भरत गुरव, डॉ. सुधाकर न्हाळदे, खंडू तांबडे यासह अन्य धनगर बांधव आदी उपस्थित होते. राज्यघटनेने धनगरांना एसटी प्रवर्गात आरक्षण दिलेले आहे.
मात्र, राज्य सरकारकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. आजवर अनेकदा धनगर समाजाची फसवणूक झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्दाला जगणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे.
त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीचे यासंदर्भातील शासन निर्णय काढून मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला दिलेला शब्द खरा करावा, अशी मागणी अॅड. गोफणे यांनी केली आहे.विधानसभा निवडणुकीत राज्यातील ८० ते ९० मतदारसंघात धनगर समाजाची निर्णायक भूमिका राहणार आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.





