Satara | राहुल गांधींच्या वक्यतव्यावरील निषेध मोर्चाचा दहिवडीत निषेध

दहिवडी, (प्रतिनिधी) – आमदार जयकुमार गोरे यांचं आरक्षणाप्रती प्रेम पुतणा मावशीचं असून मातंग समाजाच्या भिसे यांची जमीन हडपणाऱ्यांनी आरक्षणाचा खोटा कळवळा आणू नये.
काल भाडोत्री लोकांना घेवून आमदारांनी राहुल गांधी यांच्याविरोधात काढलेला मोर्चा हे आपलं पाप लपविण्याचा प्रकार होता असा हल्लाबोल करत मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्यांनी कालच्या निषेध मोर्चाचा समाचार घेतला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणविरोधी कथित विधानाच्या विरोधात काल दहिवडी येथे निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या निषेध मोर्चाचा समाचार घेण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तुपे, माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, वसंत अवघडे, किशोर सोनवणे,
सत्यवान कमाने, दत्तात्रय अवघडे, अमरजीत कांबळे, पोपट आवळे, सचिन पाटोळे, सचिन पाटोळे, महादेव देवकर, मधुकर अवघडे, बापूराव करडे, अशोक खिलारी, चांगदेव आवळे, बापूराव पवार, युवराज भोसले, संदिप चव्हाण, जीवन कांबळे,
दत्तात्रय रणपिसे, सुनिल नेटके, शिवाजी यादव, पोपट खरात, सुनिल शेळके, तानाजी वायदंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिलीप तुपे म्हणाले, नरेंद्र मोदी, अमित शहा हे वारंवार आरक्षण विरोधी वक्तव्य करत असतात. राहुल गांधी हे समानतेच्या मुद्द्यावर बोलले आहेत. जनता सबकुछ जानती है. मोर्चातील भाडेकरू लोकांचा मी निषेध करतो.
बाळासाहेब रणपिसे म्हणाले, कालचा प्रकार हा हुराळली मेंढी लागली लांडग्यांच्या मागे असा होता. आम्ही काढलेल्या आरक्षणाच्या मोर्चात विचारधारेची माणसं होती. मात्र कालच्या मोर्चात भाडोत्री माणसं होती. मोर्चातील काही लोक निळे झेंडे तुडवत चालले होते.
वसंतराव अवघडे म्हणाले, राहुल गांधी जे बोललेच नाहीत त्याबद्दल काल काढलेला मोर्चा हा कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि बेकायदेशीर होता. किशोर सोनवणे म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिली.
मात्र भाजप आणि त्याचे बगलबच्चे वेळोवेळी संविधान तुडविण्याचं काम करत आहे. कालचा मोर्चा हा समाजाचा नव्हता तर आमदार गोरे यांचा होता. जे विधान राहुल गांधी यांनी केलेच नाही त्याबद्दल कसला मोर्चा काढता? दिशाभूल करण्याची नौटंकी तत्काळ बंद करावी.
सुनील नेटके म्हणाले, राहुल गांधी व काँग्रेसने सातत्याने आरक्षणाची पाठराखण केली आहे. आरक्षण विरोधी असणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी काढलेला मोर्चा हास्यास्पद आहे. दलित समाजावर अत्याचार करणाऱ्यांचं हे प्रेम खोटं आहे.
अमरजित कांबळे म्हणाले, आम्ही राहुल गांधीच्या वक्तव्याचं समर्थन करतो. कारण त्यांना समता अभिप्रेत आहे. कालच्या मोर्चात मागासवर्गीय समाज किती होता हा मोठा प्रश्न आहे?
महात्मा जोतिराव फुले यांच्याबद्दल राज्यपालांनी अवमानकारक विधान केलं त्यावेळी का नाही काढला मोर्चा? डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर केला त्यावेळी का नाही काढला मोर्चा? डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा डोक्याला थटतोय म्हणून बाजूला करा म्हणणारे हे कसले लोकप्रतिनिधी? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.





