पिंपरी | गजा अर्थात गजनृत्य : धनगर बांधवांची एक समृद्ध परंपरा

पिंपरी, (प्रतिनिधी) – विविध संस्कृती आणि परंपरांनी आपला भारत देश समृद्ध बनला आहे. विशेषतः सण समारंभात सादर केल्या जाणाऱ्या पारंपरिक कला आणि नृत्य यावरून आपल्या समृद्ध संस्कृतीचा प्रत्यय येतो. सध्या दैनंदिन जीवनात बदललेल्या जीवनशैलीमुळे ही पारंपरिकता कमी होत आहे.
परंतु गावखेड्यात आजही जुन्या परंपरा आवडीने व श्रद्धापूर्वक जपल्या जातात. यात लोकगीतांच्या जोडीला लोकनृत्ये विशेष जपली आहेत. मावळ तालुक्यात खंडेनवमीच्या दिवशी धनगर बांधवांकडून ‘गजा’ अर्थात गजनृत्य करण्याची पूर्वापार परंपरा आहे.
सदैव निसर्गाच्या सानिध्यात राहणारा, कमीत कमी गरजा असणारा, स्वतःसह आपल्या गायी गुरं, मेंढ्या यांच्यासाठी निसर्गावर अवलंबून असतो, तो म्हणजे धनगर बांधव. त्यामुळेच तो अधिक श्रद्धाळू, अहिंसक, निसर्गउपासक असून कृतज्ञतेची जाणीव ठेवतो.
म्हणूनच खंडेनवमीच्या दिवशी चांद-सुर्याचं… आई-धरतुरीचं… वाघोबाचं… वाघजाईचं… पशूवृद्धी साठी गाई-म्हशीच्या म्होरचं… (प्रगतीचे), पांढरीतील देवाचं… अशा सर्व देवदेवतांची नावे घेऊन त्यांचे तो स्मरण (चांगभलं) करतो.
चुकून एखादे नाव विसरलेच तर (भोळा भाव सिद्धी जाव या उक्तीप्रमाणे) चुकल्या वाकल्याचं चांगभलं असं म्हणून नमनाला पुर्णत्व देतो. धनगर समाज भलेही विखुरलेला असला तरी खंडेनवमीच्या दिवशी आर्वजून एकत्र येतो.
मावळ तालुक्यातील गावखेड्यात, सह्याद्रीच्या कड्याकपारी आणि डोंगर माथ्यावर खंडेनवमीला चांगभलं च्या आवाजाने दणाणून जातो.
वाद्य विरहीत या नृत्यात आपल्या देवदेवतांची नावे घेऊन चांगभलं.. याहू बय – चाहू बय… अशी साद दिली जाते. यातील गजनृत्यात धोतर, बंडी, टोपी हा पेहराव याची जोड दिल्याने अधिक आकर्षक होतो.
एक ताल एक सुर यामध्ये धरलेला ठेका, यामुळे पाहणाऱ्याला आपणही ठेका धरावा अशी मनोमन इच्छा होते. ग्रामीण भागात अनेक परंपरा या मौखिक पद्धतीने एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हस्तांतरीत होतात, त्यामुळेच त्या टिकून आहेत. मावळातही गजा नृत्याची परंपरा अशीच टिकून आहे.
पंडीत नेहरूंनी केले होते कौतुक
सन १९५२ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या वतीने दिल्ली येथे हे धनगरी गजनृत्य सादर करण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान स्व. पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी तेव्हा या गजनृत्याचे विशेष कौतुक केले होते.
वर्ष २०२० मध्ये देखील अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर आले होते, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी गजा नृत्याची निवड केली होती. त्यावेळी देशपातळीवर गजनृत्याची विशेष दखल घेण्यात आली होती.





