पिंपरी | गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी वाजविण्यास बंदी !

लोणावळा, (वार्ताहर) – मागील काही काळात घडलेल्या दुर्दैवी घटना बघता महिला सुरक्षा, नशामुक्ती आणि सुरक्षित पर्यटन याबाबत मोठ्या स्तरावर जनजागृती होणे आवश्यक आहे. आपले सार्वजनिक उत्सव हे यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी येत्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून महिला सुरक्षा, नशामुक्ती आणि सुरक्षित पर्यटन हेच विषय केंद्रस्थानी ठेवून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी गणेश मंडळांना केले आहे.
आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण भागातील गणेश उत्सव मंडळांची आढावा बैठक लोणावळा शहरातील हॉटेल चंद्रलोक या ठिकाणी पार पडली.
यावेळी लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहा. पो.नि. सुनील पोवार, राहुल लाड, महिला सहा.पो.नि. विजया म्हात्रे, पो.उप.नि. रमेश भिसे, प्रकाश वाघमारे, लोणावळा नगर परिषदेचे अधिकारी यशवंत मुंडे,
वीज वितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाण, नासिर शेख, निखिल कवीश्वर, शादान चौधरी, यमुना साळवी, यशवंत पायगुडे, नारायण पाळेकर, शाफिक अत्तार, राजू बोराटी, विनोद होगले, अजिंक्य कुटे, लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे यांच्यासह पत्रकार, पोलीस पाटील, नागरिक आणि मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्सव काळात आक्षेपार्ह पोस्ट करणे टाळा –
गणेशोत्सव काळात प्रत्येकाने प्रत्येकाच्या जबाबदारीचे पालन केल्यास कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही. गणेशोत्सव काळात आक्षेपार्ह पोस्ट करू नका, मिरवणुकीत विनाकारण कोणाच्याही अंगावर गुलाल फेकू नका, स्पीकरच्या आवाजाची मर्यादा पाळा अशा सूचना देण्यात आल्या.
तसेच बॅनर लावणार असाल तर त्याखाली छपाई करणाऱ्याचे नाव आणि नंबर टाकलेला असावा, प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही बसवून घ्यावेत, डीजे, डॉल्बी ला परवानगी मिळणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आले.
गणेशोत्सवात दारू, जुगार, गांजा, छेडछाड प्रकार झाले तर कोणताही मुलाहिजा बाळगला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी गणेश मंडळांना दिला आहे.
शिवाय महिला सुरक्षा, नशामुक्ती आणि सुरक्षित पर्यटन या विषयांवर गणेशोत्सव काळात शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटातून निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाणार असून गणेश मंडळांनी देखील त्यांच्या स्तरावर आशा स्पर्धा घ्याव्यात असे आवाहन कार्तिक यांनी केले.
पोलिसांना कायदा वापरायला लावू नका –
बैठकीमध्ये विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी गणेश उत्सव काळामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत सूचना केल्या. त्या सूचनांवर तात्काळ कारवाई करत गणेश उत्सव काळामध्ये कोणतीही अडचण येणार नाही,
असे आश्वासन पोलीस प्रशासन, लोणावळा नगरपरिषद प्रशासन व वीज वितरण कार्यालयाकडून देण्यात आले आहे.
काही गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू व्हावी, अशा सूचना केल्या. यावर प्रशासनाकडून सर्व गणेश मंडळांनी एकत्र बैठक घेत यावर योग्य तो निर्णय घ्यावा,
पोलिसांना कायद्याचा वापर करायला लावू नये असे पोलिसांनी सुचित केले आहे. या बैठकीचे सूत्रसंचालन बापूलाल तारे यांनी केले. प्रास्ताविक सुहास जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन विजया म्हात्रे यांनी केले.





