निवासी योजनांना आता रेटिंग (भाग-1)

आपण कोणतीही इलेक्‍ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना त्याचे रेटिंग पाहतो. मग फ्रिज असो, एसी किंवा टिव्ही असो. बहुतांश खरेदीदार फाइव्हस्टार किंवा तीन स्टारपेक्षा अधिक रेटिंग असलेल्या वस्तू खरेदीबाबत आग्रही असतो. कारण ही रेटिंग म्हणजे गुणवत्ता, विजेची बचत आणि दर्जेदार उत्पादन याची हमी देणारी असते. म्हणून कंपनीपेक्षा रेटिंगला महत्त्व देणारी काही मंडळी असतात. आता अशाच प्रकारची रेटिंग आपल्याला रिअल इस्टेटमध्येदेखील उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून ग्राहकांना गृहप्रकल्पाची निवड करताना सुलभता येईल याकामी उत्तर प्रदेश रेरा प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. उत्तर प्रदेश रेरा अर्थात रिअल इस्टेट प्राधिकरण राज्यातील निवासी योजनांना रेटिंग देण्यासाठी क्रिसिल या नामांकित संस्थेची मदत घेणार आहे. या माध्यमातून उत्तर प्रदेशातील बिल्डरच्या कामगिरीला आणि त्यांच्या योजनांना काही निकषाच्या आधारावर रेटिंग दिली जाणार आहे.

उत्तर प्रदेश सरकार घर खरेदी करणाऱ्यांच्या मनात रिअल इस्टेटविषयी आणि दर्जासंबंधी विश्‍वासार्हता वाढविण्यासाठी अनोखी योजना आणत आहे. यानुसार कोणत्याही शहरात फ्लॅट, बंगला, शॉप, पेंट हाऊस खरेदी करताना बिल्डरची चाचपणी चांगल्या रितीने करणे शक्‍य होणार आहे. संबंधित ठिकाणी घर खरेदी करताना इलेक्‍ट्रॉनिक उपकरणाप्रमाणेच घराच्या योजनेचेही आपल्याला रेटिंग पाहता येणार आहे. रेटिंगच्या आधारावर तेथे घर खरेदी करावे की नाही, हा निर्णय ग्राहकाला घेता येईल. रेराचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी उत्तर प्रदेश रेराच्या न्यायिक कार्याच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त यासंदर्भात माहिती शेअर केली. रेराच्या न्यायविभागाने देखील कमीत कमी वेळात तक्रारीचे निवारण करुन ग्राहक आणि बिल्डरना दिलासा दिला आहे. गेल्या एक वर्षात उत्तर प्रदेश रेराने देशात सर्वाधिक 10,505 तक्रारीचे निवारण केले आहे. यादरम्यान महाराष्ट्रात यातुलनेत निम्म्याच तक्रारीचा निपटारा झाला आहे. आता उत्तर प्रदेश रेरा रेटिंग सिस्टिम विकसित करत आहे. यासाठी क्रिसिल या रेटिंग देणाऱ्या कंपनीची मदत घेतली जाणार आहे. या माध्यमातून उत्तर प्रदेशातील बिल्डर आणि त्यांच्या योजनांना रेटिंग दिली जाणार आहे. क्रिसिल संस्था ही बिल्डर आणि त्यांच्या गृहप्रकल्पांना 1 पासून 5 पर्यंत रेटिंग देणार आहे.

क्रिसिलच्या माध्यमातून रेटिंग देताना बिल्डरची कामगिरी, बांधकामाचा दर्जा, पूर्वीच्या योजना, देखभालीची व्यवस्था, कामातील गुणवत्ता, ताब्यात देण्याची प्रक्रिया, बिल्डरची आर्थिक स्थिती, कायदेशीर बाबींची पूर्तता या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. अर्थात ही रेटिंग बांधकामवस्थेतील प्रकल्पांसाठीच असणार आहे. ही रेटिंग ग्राहकांना संकेतस्थळावरही पाहता येणार आहे. त्यानुसार अशा प्रकारची रेटिंग रिअल इस्टेट सेक्‍टरमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तसेच गुंतवणूकदारांना योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी मदतगार साबित होऊ शकते.

1 आणि 2 रेटिंगचा अर्थ:
एक आणि 2 रेटिंगचा अर्थ अगदी सोपा आहे. इलेक्‍ट्रॉनिकमध्ये एक ते दोन रेटिंगची उपकरणे फारशी दर्जेदार नसतात. ती स्वस्त असतातच तसेच विजबिल वाढविणाऱ्याही असतात. हेच समिकरण रिअल इस्टेटलाही लागू पडते. एक ते दोन रेटिंग असेल तर बिल्डरचे ट्रॅक रिकॉर्ड चांगले नाही, असे गृहित धरले जाणार आहे. त्यामुळे अशा योजनेत पैसा गुंतवणे जोखमीचे ठरू शकते, असा त्या रेटिंगचा अर्थ काढला जाईल.

3 रेटिंगचा अर्थ: बिल्डरची कामगिरी समाधानकारक आहे, असे दोन आणि तीन रेटिंगचा अर्थ काढला जाईल.

निवासी योजनांना आता रेटिंग (भाग-2)

5 रेटिंग सर्वोत्तम:
चार आणि पाच रेटिंगचा अर्थ हा बिल्डर विश्‍वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण आहे, असा आहे. बिल्डरचे ट्रॅक रिकॉर्ड चांगले आहे आणि तेथे गुंतवणूक करण्यास हरकत नाही असा या रेटिंगचा अर्थ असेल. तेथे गुंतवणूक सुरक्षित राहू शकते, असे मानण्यात येईल.

– कमलेश गिरी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here