Salary Hike Percentage: कंपन्या यंदा किती पगारवाढ देणार? कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक इन्क्रीमेंट? जाणून घ्या
Salary Hike Percentage: EY च्या अहवालानुसार, कंपन्या आता स्किल-बेस्ड पेला प्राधान्य देत आहेत. विशेषतः AI आणि डिजिटल कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना अधिक वेतनवाढ मिळत आहे.

Salary Hike Percentage: जसजसे हे आर्थिक वर्ष संपत आले आहे, तसतसे कर्मचाऱ्यांमध्ये पगारवाढीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक कंपन्यांमध्ये अॅप्रेझलची प्रक्रियाही सुरू झाली आहे. कन्सल्टिंग फर्म Aon च्या अभ्यासानुसार, भारतातील कंपन्या यंदा सरासरी ९.१ टक्के पगारवाढ देऊ शकतात.
गेल्या दशकात मंदावली वेतनवाढ –
Aon च्या ३२व्या वार्षिक सर्वेक्षणानुसार, २०२५ मध्ये प्रत्यक्ष पगारवाढ ८.९ टक्के राहिली, जी ९.२ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा कमी होती. गेल्या दहा वर्षांचा आढावा घेतला तर, २०१५ मध्ये सरासरी वेतनवाढ १०.४ टक्के होती, जी आता ९ टक्क्यांच्या आसपास घसरली आहे. या सर्वेक्षणात ४५ उद्योगांतील १,४०० हून अधिक संस्थांचा समावेश होता.
रिअल इस्टेट आणि NBFC मध्ये सर्वाधिक वाढ –
क्षेत्रनिहाय विचार करता, रिअल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर आणि NBFC (बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी) क्षेत्रात सर्वाधिक पगारवाढ होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर ऑटोमोबाईल व वाहन उत्पादन, इंजिनीअरिंग डिझाईन सर्व्हिसेस, इंजिनीअरिंग व मॅन्युफॅक्चरिंग आणि रिटेल क्षेत्रातही सरासरीपेक्षा अधिक वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. EY च्या ‘फ्युचर ऑफ पे २०२६’ अहवालानुसार फायनान्शियल सर्व्हिसेस, ई-कॉमर्स, लाईफ सायन्सेस आणि फार्मास्युटिकल्स क्षेत्रातही चांगली वेतनवाढ अपेक्षित आहे.
लेबर कोड आणि जागतिक अनिश्चितता हे मोठे आव्हान –
नव्या लेबर कोडमुळे कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला आहे. Mint च्या अहवालानुसार, देशातील टॉप-३० पैकी २५ कंपन्यांना तिसऱ्या तिमाहीत सुमारे १२,००० कोटी रुपयांचा भार सहन करावा लागला. याशिवाय टॅरिफ बदल, जागतिक व्यापारयुद्ध आणि IT क्षेत्रात AI मुळे नोकऱ्यांवर होणारा परिणाम या बाबीही वेतनवाढीवर दबाव आणत आहेत.
Aon इंडियाचे असोसिएट पार्टनर अमित कुमार ओटवानी यांनी सांगितले की, “नव्या लेबर कोडमुळे कंपन्यांना अनेक दशकांतील सर्वात मोठ्या नियामक बदलांना सामोरे जावे लागत आहे. या बदलांबाबत कर्मचाऱ्यांना स्पष्ट माहिती देणे त्यांचा विश्वास टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”
AI कौशल्य असलेल्यांना अधिक पगार –
EY च्या अहवालानुसार, कंपन्या आता स्किल-बेस्ड पेला प्राधान्य देत आहेत. विशेषतः AI आणि डिजिटल कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांना अधिक वेतनवाढ मिळत आहे. रिअल इस्टेट, NBFC आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील अधिक वेतनवाढ हे दर्शवते की कंपन्या महत्त्वाच्या प्रतिभावान कर्मचाऱ्यांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, असे Aon इंडियाचे रूपांक चौधरी यांनी नमूद केले.





