Resale House: सावधान! जुने घर घेताना ‘या’ 5 चुका टाळा, नाहीतर आयुष्यभराची कमाई बुडणार!
Resale House:

Resale House: नवीन घरांच्या वाढत्या किमतींमुळे मध्यमवर्गीय खरेदीदार आता जुन्या घरांच्या म्हणजेच ‘रीसेल’ बाजाराकडे वळू लागले आहेत. नोब्रोकरच्या ताज्या अहवालानुसार एक कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीची नवीन घरे बाजारात मिळणे कठीण झाले असून बांधकाम व्यावसायिक आता प्रीमियम आणि लक्झरी प्रकल्पांवरच भर देत आहेत.
नवीन घरे का महागली?
जमिनीच्या वाढत्या किमती आणि बांधकाम खर्चात झालेली वाढ यामुळे बांधकाम व्यावसायिक चांगला नफा मिळवण्यासाठी प्रीमियम प्रकल्पच आणत आहेत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, चांगल्या शहरांमध्ये मध्यम आणि कमी किमतीची नवीन घरे आता अत्यंत कमी झाली आहेत. अनेक लोकप्रिय भागांमध्ये नवीन प्रकल्पांसाठी जागाच शिल्लक नसल्याने जुनी घरे पाडून नवीन इमारती बांधल्या जात आहेत.
रीसेल घरे का फायदेशीर?
रीसेल घरे चांगल्या वस्तीत आणि तयार सुविधांसह मिळतात. शिवाय त्यांची किंमतही रास्त असते. नवीन घरांवर जीएसटी भरावा लागतो, त्यामुळे ती आणखी महाग पडतात. रीसेल घर घेतल्यास बांधकाम पूर्ण होण्याची वाट पाहावी लागत नाही, किरायावर राहून हप्तेही भरावे लागत नाहीत. खरेदीपूर्वी घर, सोसायटी आणि परिसर प्रत्यक्ष पाहता येतो.
हेही वाचा -30 दिवसांत गॅस सिलिंडर संपणार? पश्चिम आशियातील युद्धाचा भारताला मोठा फटका!
खरेदीपूर्वी ‘या’ गोष्टी तपासा –
मात्र रीसेल घर घेताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.
मालकी तपासा : वकीलाकरवी गेल्या ३० वर्षांतील सर्व मालकांची नोंदणी तपासा. ज्याच्याकडून घर विकत घेत आहात, त्याच्याच नावावर शेवटची नोंदणी असल्याची खात्री करा.
कायदेशीर तपासणी : घर कोणत्या वादात अडकलेले नाही ना आणि सरकार त्यावर ताबा घेत नाही ना, हे तपासा.
एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट घ्या : या प्रमाणपत्रामुळे घरावर कोणतेही कर्ज किंवा वाद नाही, हे सिद्ध होते.
परवानग्या तपासा : प्रकल्पाची मंजुरी, बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आणि रेरा मंजुरी असल्याची खात्री करा.
सोसायटी एनओसी घ्या : विक्रेत्याचे देखभाल शुल्काचे थकबाकी नाही ना, याची खात्री करा आणि सोसायटीचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्या.
‘या’ प्रकरणांत घर घेऊ नका –
या क्षेत्रातील तज्ज्ञ काही धोक्याच्या गोष्टी सांगतात. मूळ कागदपत्रे नसतील, नोंदणीत खंड असेल, घरात अनधिकृत बदल केले असतील किंवा रोख रकमेत मोठी सवलत देण्याची ऑफर असेल तर अशा व्यवहारापासून दूर राहणेच हितावह आहे. एकापेक्षा जास्त मालक असल्यास सर्वांची संमती असल्याशिवाय खरेदी करू नका.
गृहकर्जासाठी ‘हे’ लक्षात ठेवा –
रीसेल घरासाठी कर्ज मंजूर करताना बँका कागदपत्रांची कसून तपासणी करतात. बॅंक अधिकारी सांगतात की ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नसेल किंवा सोसायटीचे एनओसी नसेल तर कर्ज मिळत नाही. त्यामुळे आधी बँकेची कर्ज प्रक्रिया सुरू करा आणि कर्ज मंजूर होईपर्यंत टोकन मनी देऊ नका. चांगले कर्ज मिळवण्यासाठी क्रेडिट स्कोअर ७९०-८०० किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.





