Pune District : रेश्मा शिंदे यांचा स्पष्ट विकास आराखडा; भूमिपुत्रांच्या हितासाठी अपक्ष उमेदवारीने वेधले लक्ष
Pune District : प्रत्येक शेतकऱ्याला योजनांचा थेट लाभ मिळवून देणे, कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करणे, सौरऊर्जेवर आधारित पंप उपलब्ध करून देणे आणि गावागावात अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करणे हे जाहीरनाम्याचे मुख्य मुद्दे आहेत.

तळेगाव ढमढेरे : रांजणगाव सांडस गटाच्या अपक्ष उमेदवार रेश्मा जयेश शिंदे यांनी मतदारांसमोर विकासाचा सर्वसमावेशक आराखडा मांडत निवडणूक प्रचारात आघाडी घेतली आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणारे जयेश शिंदे यांच्या कार्याचा वारसा घेऊन रेश्मा शिंदे रिंगणात उतरल्या आहेत. शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला त्यांचा जाहीरनामा सध्या ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरत असून, मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी त्यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे.
प्रत्येक शेतकऱ्याला योजनांचा थेट लाभ मिळवून देणे, कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करणे, सौरऊर्जेवर आधारित पंप उपलब्ध करून देणे आणि गावागावात अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करणे हे जाहीरनाम्याचे मुख्य मुद्दे आहेत. शेतकरी सक्षम झाल्याशिवाय गाव समृद्ध होणार नाही, असा ठाम विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
महिलांसाठी मोफत व सुलभ आरोग्यसेवा, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था, २४ तास कार्यरत असणारी महिला सुरक्षा हेल्पलाइन आणि आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन अशा उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत. या तरतुदींमुळे महिला मतदारांमध्ये सुरक्षिततेचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
युवकांच्या भविष्यासाठी दिशा
एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी गावातच मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, विविध क्षेत्रांतील रोजगार संधींसाठी कौशल्य प्रशिक्षण देणे आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी सहकार्य करणे यावर भर दिला आहे. नोकरीसाठी शहराकडे धाव घेण्याऐवजी गावातच संधी निर्माण करण्याचा संदेश तरुणाईला दिला जात आहे.
कामाचा विश्वास, लोकांचा पाठिंबा
पूर्वी केलेल्या सामाजिक उपक्रमांची आठवण करून देत, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचे शिंदे यांनी अधोरेखित केले आहे. ‘काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी द्या’ असे आवाहन जयेश शिंदे यांनी मतदारांना केले आहे.





