Pune District : आरक्षण जाहीर, इच्छुकांची लगबग; पुरंदर तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे जोरदार

सासवड : पुरंदर तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांची चाहूल लागली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरक्षणाची सोडत जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी प्रचार, गाठीभेटी, मजबूत संघटन बांधणी आणि मतदार संपर्क यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या निवडणुकीत तालुक्यातील 8 पंचायत समिती सदस्य आणि 4 जिल्हा परिषद सदस्य निवडले जाणार आहेत.
यामध्ये पंचायत समितीच्या सभापती पदाची सोडत प्रथम जाहीर करण्यात आली असून ते पद ओबीसी आरक्षणासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. पंचायत समिती गणांमध्ये ओबीसी आरक्षण मिळाले आहे, तेथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुरंदर तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी देखील सुरू आहेत. माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने भाजपाची ताकद वाढली असली तरी त्यांचे स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवणे ही मोठी कसोटी ठरणार आहे. दुसरीकडे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती करणार असल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे तालुक्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा परिषद क्षेत्रीय समीकरणे बेलसर – माळशिरस जिल्हा परिषद गटावर अनेक वर्षे माजी सदस्य सुदामराव इंगळे यांचे प्राबल्य राहिले आहे. तर दिवे – गराडे गटात माजी मंत्री दादासाहेब जाधवराव यांचा प्रभाव अनेक वर्ष राहिला आहे. या गटातील काही गावे पुरंदर विमानतळ प्रकल्पात येत असल्याने भूसंपादनामुळे मतदार असंतोष वाढू शकतो. याचा कोणत्या उमेदवाराला फटका बसेल किंवा फायदा मिळेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या सर्व घडामोडींमध्ये स्थानिक स्तरावर गटबाजी, पक्षांतर, नवे चेहरे आणि जुन्या नेतृत्त्वाचा प्रभाव असे विविध राजकीय प्रयोग दिसत आहेत. विमानतळ प्रकल्प, स्थानिक विकास कामे, महिलांचे आरक्षण, मागास प्रवर्गातील प्रतिनिधित्व, आणि मोठ्या नेत्यांचे राजकीय निर्णय यांचा या निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. पुढील काही दिवसात उमेदवारी अर्ज, पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर होणे, बंडखोरी आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. पुरंदर पंचायतीतील ही निवडणूक केवळ स्थानिक नसून पुरंदरचे राजकीय भविष्य ठरवणारी निर्णायक लढत ठरणार आहे.
जिल्हा परिषद गट आरक्षण व प्रमुख इच्छुक
बेलसर – माळशिरस (सर्वसाधारण) – दत्ता झुरंगे, गौरव कोलते, रमेश इंगळे, माऊली यादव, कैलास कामथे
दिवे – गराडे (सर्वसाधारण महिला)- अॅड. गौरी कुंजीर, ज्योती झेंडे, संगीता काळे,
नीरा – कोळविहीरे (ओबीसी महिला)- सानिका अजिंक्य टेकवडे, डॉ. प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे, तेजश्री काकडे, सम्राधनी सचिन लांबाते.
वीर – भिवडी (सर्वसाधारण)- ममता लांडे शिवतारे, पुष्कराज जाधव, हरिभाऊ लोळे, दिलीप यादव, राहुल गायकवाड.
पंचायत समिती गण आरक्षण व इच्छुक उमेदवार
बेलसर (सर्वसाधारण)- सुनीता केलते, योगेश कामथे, राजेंद्र भोसले, धीरज जगताप, कैलास जगताप, अॅड बाबासाहेब पिलाणे, निलेश कृष्णा जगताप.
माळशिरस (सर्वसाधारण)- पंढरीनाथ सोनवणे, संभाजी काळाणे, महादेव शेंडकर, आरूण यादव, महादेव बोरावके.
दिवे (ओबीसी)- अमित झेंडे, अॅड. नितीन कुंजीर, सुरज गदादे, अमोल कामठे.
गराडे (सर्वसाधारण स्त्री)- अर्चना कटके, सुषमा कटके, दिव्या जगदाळे.
नीरा (एससी महिला)- मोनिका गायकवाड, हेमलता जगदाळे
कोळविहीरे (सर्वसाधारण स्त्री) – भारती मस्के, अंजना भोर, सोनाली कणसे, ज्योती भुजबळ, सारिका कुदळे
वीर (सर्वसाधारण)- ऋतुजा धुमाळ, समीर जाधव, छाया यादव
भिवडी (ओबीसी महिला)- नलिनी लोळे, पुजा मोकाशी, शैला मोकाशी





