केंद्रीय कृषी कायदे मागे घ्या; अन्यथा देशव्यापी आंदोलन
केंद्रीय कृषी कायदे मागे घ्या; अन्यथा देशव्यापी आंदोलन ममता बॅनर्जी यांचा इशारा

कोलकता – शेतकरीविरोधी असणारे नवे कृषी कायदे मोदी सरकारने मागे घ्यावेत. अन्यथा, देशव्यापी आंदोलन छेडू, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी दिला.
तृणमूल कॉंग्रेस प्रारंभापासून केंद्रीय कृषी कायद्यांना तीव्र विरोध करत आहे. शेतकरी आणि त्यांच्या उदरनिर्वाहाबद्दल आम्हाला चिंता आहे. उद्या (शुक्रवार) तृणमूलची बैठक होणार आहे. त्या बैठकीत जीवनावश्यक वस्तू कायद्यामुळे सामान्य माणसावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा होईल. त्या कायद्यामुळे महागाईत भर पडली आहे. जनतेच्या हिताविरोधात असणारा तो कायदाही मागे घेतला जावा, अशी मागणी ममता यांनी ट्विटरवरून केली.
मोदी सरकारने सार्वजनिक मालमत्ता विकण्याचा सपाटा लावला आहे. आपण देशाच्या संपत्तीचे रूपांतर भाजपच्या मालमत्तेत होऊ देता कामा नये. मोदी सरकारने अयोग्य निर्गुंतवणूक आणि खासगीकरण धोरण रद्द करावे, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक पाच ते सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे ममतांनी मोदी सरकार आणि भाजपविरोधात आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचे वारंवार दिसून येत आहे.





