पुणे | बाल न्याय मंडळातील दोन सदस्यांची हकालपट्टी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पोर्शे कार भरधाव चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला वाहतूक सुरक्षेबाबत तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून तत्काळ जामीन देण्यात आला होता. असा आदेश देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या दोन सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
राज्य शासनाने याबाबातची अधिसूचना काढून पदाच्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत दोन सदस्यांना सेवेतून हटविले आहे.
डॉ. लक्ष्मण नेमा धनवडे आणि कविता तुळशीराम थोरात अशी सदस्यांची नावे आहेत. अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याच्या अटी-शर्तींवर जामीन मंजूर केल्यानंतर समाजात टीकेची झोड उठली होती.
त्यानंतर महिला व बाल विकास आयुक्तालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोघा सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच बाल न्याय मंडळाच्या निर्णयाबाबत चौकशी करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती.
त्या समितीने सुमारे शंभरापेक्षा अधिक पानांचा अहवाल महिला व बाल कल्याण आयुक्तालयाकडे पाठविला होता. अल्पवयीन मुलाला जामीन देताना बाल न्याय मंडळातील एका सदस्याने भूमिका मांडली होती.
ती भूमिका न्याय मंडळासमोर ठेवल्यानंतर दुसऱ्या सदस्याने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे एक सदस्य दोषी नाही, तर दुसरा सदस्यही दोषी आहे. मंडळाने निर्णयादरम्यान पुराव्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. तक्रारीतील माहिती विचारात घेतली नाही, अशा अनेक त्रुटी आढळल्या होत्या.
त्याचा अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे त्या दोघा सदस्यांना नोटीस पाठवून त्यांचे म्हणणे मांडण्याच्या सूचना केली होती.
त्यानुसार त्यांचा खुलासा आल्यानंतर महिला व बाल कल्याण आयुक्तालयाने त्यांच्या खुलाशासह स्वतंत्र अहवाल राज्य सरकारकडे पाठविला होता. महिला व बाल विकास विभागाचे उपससचिव आ. ना. भोंडवे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
महिला व बाल् विकास आयुक्तालयाकडून संबंधित् सदस्यांची चौकशी करण्यात आली होती. त्याचा प्रस्ताव् राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने ही कारवाई केली आहे- डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, महिला व बाल कल्याण विभाग् पुणे





