पुणे | बाल न्याय मंडळ सदस्य चौकशीच्या फेर्यात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बेदरकारपणे अलिशान मोटार चालवित दोघांचा बळी घेणार्या अल्पवयीन मुलाला शिक्षा म्हणून चक्क ३०० शब्दांचा निबंध लिहायला लावणारे बाल न्याय मंडळ आता चौकशीच्या फेर्यात अडकले आहे. अल्पवयीन मुलाचा जामीन मंजूर करणे मंडळ सदस्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. या प्रकरणात त्यांची चौकशी करण्याचे आदेश महिला आणि बाल न्याय मंडळाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिले आहे. त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे.
बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या अल्पवयीन मुलाने मद्यपान करुन एका दुचाकीला धडक दिली. त्यात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर अल्पवयीनाला पोलिसांनी बाल न्याय मंडळापुढे हजर केले होते. त्यावेळी शिक्षा म्हणून मंडळाने आरोपीला अवघ्या १५ तासांत जामीन मंजूर केला.
तसेच आरोपी कारचालकाने १५ दिवस येरवडा ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियोजन करावे, व्यसन सोडवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत, अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहावा, भविष्यात अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यास मदत करावी असे बाल न्याय मंडळाने सांगितले होते.
बाल न्याय मंडळाच्या निर्णयावर नागरिकांसह सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली होती. मद्यधुंद अवस्थेत सुसाट कार चालवत दोघांचा जीव घेणार्या आरोपीला एवढ्या लवकर कसा जामीन मिळतो, त्याची चौकशी का केली जात नाही? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला होता.
विशेषतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंडळाच्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले होते. दरम्यान, पोलिसांच्या अर्जानुसार बाल न्यायमंडळाने अल्पवयीनाला १४ दिवस बालसुधारगृहात पाठविण्याचे आदेश नव्याने दिले होते. बालन्याय मंडळाच्या सदस्यांनी पहिल्यांदा दिलेल्या निर्णयावर चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
अपघातप्रकरणी तीन पिढ्या गोत्यात, १० जणांना अटक
अपघातप्रकरणी अल्पवयीन चालकाला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तर मुलाचे वडील विशाल अग्रवाल. आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.
त्यासह हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, ब्लॅक बारचा मालक संदीप सांगळे, कर्मचारी नितेश शेवाणी, जयेश गावकर यांच्यासह ससूनमधील डॉ. अजय तवारे, डॉ. श्रीहरी हळनोर, शिपाई अतुल घाटकांबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे.





