Pune Porsche Accident : बाल न्याय मंडळाच्या’ त्या’ दोन सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी…

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोर्श कारचालक अल्पवयीन आरोपीला अवघ्या पंधरा तासांच्या आत तीनशे शब्दांच्या निबंधलेखनासह विविध अटींवर जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या दोन सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तांनी केली आहे.
बाल न्याय मंडळाच्या सदस्यांनी दिलेल्या निर्णयाबाबत चौकशी करण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाने पाच अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने सुमारे शंभरपेक्षा अधिक पानांचा अहवाल विभागाकडे नुकताच सादर केला होता. त्यामध्ये या सदस्यांनी या मुलाला जामीन मंजूर करण्याच्या प्रक्रियेत केलेल्या चुका अधोरेखित करण्यात आल्या आहेत. हा अहवाल आयुक्तांनी राज्य सरकारकडे सादर केला असून, मंडळाच्या सदस्यांवर कारवाईची शिफारस केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कल्याणीनगर येथे बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून दुचाकीला धडक दिल्याने तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या मुलाला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासह विविध अटींवर बाल न्याय मंडळाच्या सदस्याने जामीन मंजूर केला होता. त्यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना मंडळाच्या सदस्यांनी निकषांचे पालन केले की नाही, हे पडताळण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने २२ मे रोजी पाच सदस्यांची समिती नेमली होती. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यातील तरतुदींनुसार ही समिती स्थापन करण्यात आली होती.
समितीने त्यांचा शंभर पानी अहवाल सादर केला असून, त्यामध्ये अल्पवयीन मुलाला जामीन देताना नियमांचे पालन केले नसल्याचे नमूद केले आहे. या मुलाला घाईघाईत जामीन दिल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. एका सदस्याने आरोपीला जामीन मंजूर केल्यानंतर इतराने त्याला पाठिंबा देण्याची गरज नव्हती, ते जामीन आदेश रद्द करू शकले असते, असे निरीक्षणही अहवालात नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, या संदर्भात आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.





