पोर्शे अपघात प्रकरण : मुलाला प्रौढ घोषित करण्याच्या अर्जावर १८ नोव्हेंबरला सुनावणी

पुणे : बाल न्याय मंडळ येथे कल्याणीनगर पोर्शे अपघातातील मुलाला प्रौढ ठरवून त्याविरोधात फौजदारी खटला चालविण्यासाठी पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जावर पुढील सुनावणी आता १८ नोव्हेंबरला होणार आहे. यासह पोर्शे कार मिळण्याबाबत आणि मुलाच्या पासपोर्टबाबत दाखल केलेल्या अर्जावर देखील याच दिवशी युक्तिवाद होणार आहे.
या प्रकरणाची सुनावणी सोमवारी (दि. २१) होणार होती. मात्र त्यास पुढील तारीख देण्यात आली आहे, अशी माहिती या प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली. अपघाताच्या गुन्ह्यात मुलाला जामीन झाला आहे. तर त्याचे आई-वडील आणि ससूनमधील डॉक्टर अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान अपघात प्रकरणी मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात विविध कलमांनुसार कलमवाढ करण्यात आली आहे.
तपासात मुलाचा इतर गुन्ह्यांत देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने ही कलमवाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, अपघातानंतर काही तासांत मुलाला जामीन देणाऱ्या मंडळातील दोन सदस्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. राज्य शासनाने याबाबतची अधिसूचना काढून पदाच्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना सदस्यांकडून पुष्कळ चुका राहिल्या आहेत, असा अहवाल या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने सादर केला होता. त्यानुसार सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना चुकांबाबत स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला होता. सदस्यांचा त्यांचा खुलासा आल्यानंतर आयुक्तालयाने त्यांच्या खुलाशासह स्वतंत्र अहवाल राज्य सरकारकडे पाठविला होता.





