पुणे जिल्हा | पशुपालकांना दिलासा : सद्यःस्थितीत 265 जनावरे आश्रित

वाल्हे, (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील वाल्हे व परिसरात मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने चारा-पाण्याची भीषणटंचाई निर्माण झाली होती. जनावरांच्या चार्याची समस्या निर्माण झाल्याने 16 मे पासून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून भारतीय जैन संघटनेने वाल्हे जवळील भुजबळ कामठवाडी येथे जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्यात आली होती.
यामुळे परिसरातील जनावरांचा चार्या-पाण्याचा प्रश्न सुटला होता. या छावणीत जवळपास 500 पेक्षा अधिक जनावरे दाखल झाली होती. सद्यःस्थितीत 265 जनावरे आहेत. दरम्यान, अद्यापही समाधानकारक पाऊस न झाल्याने चारा छावणीस पुढील काही दिवस मुदतवाढ देण्यात आल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.
या छावणीस माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी भेट देऊन, जोपर्यंत मुबलक पाऊस होऊन, विहीरीची परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत, ही छावणी सुरूच राहील असे आश्वासन दिले होते. सद्यःस्थितीत वाल्हे व परिसरात फक्त 55 मिलीमीटर पाऊस पडला असून, अद्यापपर्यंत कोणत्याही विहिरी, बोअरवेलची पाणीपातळी वाढली नाही.
तसेच सर्वत्र टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असून, जर पाऊसच पडल नसेल तर, पाणीपातळी कशी काय वाढेल ? यामुळे, चारा छावणी मुबलक पाऊस पडेपर्यंत बंद करू नये. नाहीतर, चारा- पाण्याअभावी पशुधन सांभाळणे पशुपालकां समोर मोठे आव्हान असल्याने ही चारा छावणी पाऊस पडेपर्यंत सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे.





